वसई: १६ ऑगस्ट दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवातील धोका लक्षात घेता वसई विरार महापालिकेकडून गोविंदांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. जवळपास सहा हजार इतक्या गोविंदांना हे संरक्षण दिले जाणार आहे. त्यानुसार नोंदणी करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
दहीहंडी सणालासाहसी खेळाचा दर्जा दिल्याने या खेळातील चुरस अधिकच वाढली आहे. वसई विरार मध्येही अनेक ठिकाणी मोठं मोठ्या दहीहंड्या लावल्या जाणार आहेत.
विशेषतः उंचावरील मानाच्या हंड्या, मोठ्या रक्कमेच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदांची चढाओढ सुरू असते. काही वेळा मनोरे रचताना अपघाता सारख्या घटना घटना घडतात.अशा वेळी गोविंदांचा विमा नसल्याने उपचारादरम्यान अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून वसई विरार महापालिकेकडून गोविंदांना मोफत विम्याचे संरक्षण दिले जाते. यावर्षी ही १६ ऑगस्ट ला गोपाळकाला उत्सव साजरा होत. यासाठीचे नियोजन व विमा संरक्षण याबाबत शुक्रवारी महापालिकेच्या मुख्यालयात बैठक पार पडली.
या बैठकीत खासदार डॉ. हेमंत सवरा, महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार, माजी महापौर राजीव पाटील, गोविंदा पथकाचे राज्यस्तरीय अध्यक्ष बाळा पडळकर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले- श्रींगी, उपायुक्त (क्रीडा) दीपक झिंजाड यासह दहीहंडी आयोजक मंडळे, गोविंदा पथक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत यावर्षी ही गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आल्या आहे. प्रत्येकी गोविंदा ७५ रुपये प्रमाणे ६ हजार गोविंदांचा विमा काढण्याचे नियोजन करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. मागील वर्षी महापालिकेने ११० गोविंदा पथकांच्या गोविंदांचा विमा उतरविला होता त्याच प्रमाणे यंदाही ओरिएंटल कंपनीद्वारे हा विमा उतरविला जाईल असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे. उत्सव साजरा करताना गोविंदा पथके व आयोजक मंडळे यांनी नियमांच्या चौकटीत राहून नियोजन करावे. विशेषतः शेवटच्या मनोऱ्यावर जो गोविंदा असेल तो चौदा वर्षाच्या वरील असावा, सुरक्षा साधने, डीजेचा आवाज कमी, वैद्यकीय सेवा, मंडप व्यवस्था अशा प्रकारच्या विविध सूचना या बैठकीत गोविंदा पथके व आयोजकांना करण्यात आल्या.
अशी असेल विम्याची मदत
दहीहंडी उत्सवादरम्यान अपघाताग्रस्त गोविंदांना मदत दिली जाते.यात अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला १० लाखांची मदत, एक हात, पाय, डोळा निकामी झाल्यास ५ लाख , दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख, तसेच अपघातामुळे रुग्णालयात होणारा १ लाखापर्यंतचा खर्च विमा कंपनी यांच्या मार्फत दिला जाणार आहे. तसेच इतर किरकोळ जखमी असतील त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. शहरात आयोजनाचा ठिकाणी रुग्णवाहिका, आरोग्य पथके, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.
परवानगी साठी एक खिडकी योजना
वसई विरार शहरातही मोठ्या प्रमाणात दहीहंड्या लावल्या जातात. या दहीहंडी आयोजकांना लागणाऱ्या आवश्यक परवानगी आहेत त्यासाठी महापालिकेकडून एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. वाहतूक, महापालिका, महावितरण, अग्निशमन, पोलीस प्रशासन अशा सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली जाणार आहे यासाठी नऊ प्रभागीय कार्यालय व मुख्यालय अशा दहा ठिकाणी ही व्यवस्था असणार आहे.ही सुविधा ऑनलाइन स्वरूपात ही उपलब्ध करून दिली जाईल असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.