वसई: वसई विरार महापालिकेकडून फेरीवाल्यांच्या नियोजनासाठी फेरीवाला धोरण लागू करण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्यामुळे फेरीवाल्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुधवारी महापालिका मुख्यालयात फेरीवाला बचाव संघर्ष समितीकडून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले जाणार आहे.
वसई विरार शहरातील फेरीवाल्यांची संख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. त्यातच विविध रस्ते, पदपथ, बसथांबे, रेल्वे स्थानक परिसर, उड्डाणपूल अशा विविध ठिकाणी अवैध फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर तोडगा म्हणून फेरीवाला शहर पथविक्रेते समिती नियुक्त केली होती.
या समितीच्या शिफारशीनुसार पहिल्या टप्प्यात नऊ प्रभागाचे सर्वेक्षण करून ८७ ठिकाणी तात्पुरता स्वरूपात फेरीवाला बसवण्यासाठीच्या जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, या धोरणाची योग्यरित्या अंमलबजावणी होत नसल्यामुळे फेरीवाल्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवार, ५ ऑगस्ट महापालिका मुख्यालयरोजी फेरीवाला बचाव संघर्ष समितीकडून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले जाणार आहे.
यावेळी २०१४ पासून प्रलंबित असलेले फेरीवाल्यांचे सर्वेक्षण तातडीने पुन्हा सुरू करणे, सर्व फेरीवाल्यांना अधिकृत ओळखपत्रे व विक्री प्रमाणपत्रे देणे, मनमानी वसुली व अवैध पावत्या तात्काळ थांबवणे, कायद्यानुसार नगर पथविक्रेता समितीची स्थापना करणे आणि पुनर्वसन न करता मालजप्ती व हकालपट्टीची कारवाई पूर्णपणे बंद करणे, अशा विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत. तसेच फेरीवाल्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पालिका मुख्यालयासमोरच मुक्कामी आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेच्या अध्यक्ष रुपाली पवार यांनी दिला आहे.
