वसई:- फेरीवाला सर्वेक्षण, अनधिकृत कारवाई थांबवणे, फेरीवाला झोन निश्चित करणे आणि अधिकृत ओळखपत्रे देणे या प्रमुख मागण्यांसाठी ‘फेरीवाला बचाव संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही अधिक तीव्र झाले आहे. ५ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने फेरीवाल्यांनी वसई-विरार महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला होता. रात्रभर महापालिकेच्या दारात उघड्यावर ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांनी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय येथून हटणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केल्यामुळे महापालिका प्रशासन आणि फेरीवाल्यांमधील संघर्ष आता पेटण्याची चिन्हे आहेत.

​बुधवारी दिवसभर आंदोलन चालल्यानंतरही महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांशी कोणतीही चर्चा केली नाही. उलट, कार्यालयीन वेळ संपताच अधिकारी आंदोलकांकडे दुर्लक्ष करत निघून गेल्याचा आरोप समितीने केला आहे. प्रतिकूल वातावरण, डासांचा प्रचंड त्रास आणि सुविधांचा अभाव असतानाही महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी रात्रभर मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे आंदोलकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, नागरिकांच्या हक्कांकडे अधिकारी डोळेझाक करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

​दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी प्रशासनाच्या भूमिकेमुळे आंदोलकांच्या संतापात आणखी भर पडली. सकाळी कार्यालयात येताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांना तोंड देणे टाळण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराऐवजी मागच्या गेटचा वापर केल्याचा गंभीर आरोप फेरीवाल्यांनी केला आहे. सामान्य नागरिक आणि भेटीसाठी येणारे लोक मुख्य गेटचा वापर करत असताना अधिकारी मात्र मागील दाराने पळ काढत असल्याचा टोला आंदोलकांनी लगावला. प्रशासनाची ही टाळाटाळीची वृत्ती निषेधार्ह असून जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रवेशद्वारावरच ठाण मांडून बसू आणि गरज पडल्यास आणखी कित्येक रात्री महापालिकेच्या दारातच घालवू, असा इशारा फेरीवाल्यांनी दिला आहे.