वसई: मागील काही दिवसांपासून वसई-विरार शहरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या संततधार पावसामुळे संपूर्ण वसई-विरार शहर जलमय झाले असून, अनेक भागांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. मात्र, एकीकडे या पूरस्थितीमुळे हजारो नागरिकांचे अतोनात नुकसान होत असताना, दुसरीकडे अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावरील पाण्यात मौजमजा करण्यासाठी उतरल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई, विरार आणि नालासोपारा परिसरातील सखल भागात कंबरेपेक्षा जास्त पाणी साचले आहे. रस्त्यांवर, सोसायट्यांच्या आवारात आणि घराघरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या उपकेंद्रांमध्येही पाणी साचले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने अनेक भागांतील वीज पुरवठा बंद केला आहे.
परिणामी, ३० तासांहून अधिक काळ अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. एकीकडे घरात पाणी शिरल्याने आणि वीज नसल्याने हजारो नागरिक हवालदिल झाले आहेत. कधी एकदाचे हे पाणी ओसरते अशी मनस्थिती झाली आहे.
पण याउलट, विरार आणि नालासोपारा भागातील काही मुख्य रस्त्यांवर वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. साचलेल्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी तरुण, लहान मुले आणि काही नागरिक थेट रस्त्यावर उतरले आहेत. एखाद्या नामांकित ‘वॉटर पार्क’मध्ये असावी तशी गर्दी सध्या विरारच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. पाण्यात पोहणे, एकमेकांवर पाणी उडवणे, उड्या मारणे यात मग्न असल्याचे दिसून येत आहे.
अपघाताचा धोका
नागरिकांच्या या अशा बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. रस्त्यावरील साचलेले पाणी हे उघड्या गटारांचे आणि नाल्यांचे दूषित पाणी असते. अशा पाण्यात वावरल्याने लेप्टो, डेंग्यू, मलेरिया आणि त्वचेचे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका असतो. तसेच, पाण्याच्या प्रवाहामुळे उघडी गटारे किंवा मॅनहोल दिसत नसल्याने गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
