वसई: वसई विरार शहरात शनिवार सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे वसई-विरारच्या शहरी आणि ग्रामीण भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीत विविध ठिकाणी अडकलेल्या तब्बल २२२ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात सई-विरार अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले आहे.
शहरातील सखल भागात आणि ग्रामीण भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक जागच्या जागी अडकून पडले होते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विविध भागांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक बचावकार्य राजावळी परिसरात झाले, जिथून १०० जणांची सुटका करण्यात आली. याशिवाय मधुबनमधून ४१, निर्मळमधून ३०, सकवारमधून १९, सारजा मोरीगावातून १२, संतोष भवनमधून १०, विरारच्या विराटनगर आणि सुंदरनगर परिसरातून ५, वसई स्टेशन भागातून ३, तर सातीवली ते आचोळे दरम्यान २ अशा एकूण २२२ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
एकीकडे हे बचावकार्य यशस्वी ठरले असले, तरी दुसरीकडे एक चिंताजनक घटना घडली आहे. राजावळी वाघराळपाडा येथे पुराच्या पाण्यात पोहत असताना एक ५५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली आहे. पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने ही व्यक्ती वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत असून, अग्निशमन दलाकडून या व्यक्तीचा शोध सुरू आहे. शहरातील पूरस्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
