वसई: वसई-विरार शहरात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः वेढा घातला आहे. सोमवारीही दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने संपूर्ण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. २४ तासांत शहरात तब्बल २०३ मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक मुख्य रस्ते आणि निवासी भाग पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
अतिवृष्टीमुळे विरार, नालासोपारा आणि वसईतील प्रमुख भागांना तलावाचे स्वरूप आले आहे. विरार ग्लोबल सिटी, गोकुळ टाऊनशिप, म्हाडा परिसर, पुष्पानगर, जुने विवा विद्यालय, विराट नगर, बोळींज रस्ता, महापालिका मुख्यालय परिसर आणि चंदनसार भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. स्टेशन रोड, तुळींज रस्ता, नगिनदास पाडा, विजय नगर, वाकणपाडा, धानिव बाग, गालानगर आणि एसटी डेपो परिसर जलमय झाले आहेत.
वसई देवतलाव, सागरशेत, चुळणे, माणिकपूर, भुईगाव, सनसिटी गास, अर्नाळा रस्ता, गिरीज तसेच पूर्वेकडील मधुबन, सातीवली, वसंत नगरी रस्ता, रेंज नाका आणि एव्हरशाईन भागात पाण्याचा वेढा आहे.
नायगाव पूर्व-पश्चिम आणि चिंचोटी, कामण-भिवंडी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई फाटा, ससूनवघर अशा भागात पाणी साचले आहे. ग्रामीण भागातील चांदीप, पारोळ यासह अनेक भागांत पाणी साचले असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यावरील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याचा तडाखा- वीज आणि इंटरनेट गुल
पावसासोबतच सुटलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडणे, इमारतींच्या गॅलरीचा सज्जा कोसळणे आणि संरक्षक भिंती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यातच शहरात इंटरनेट सुविधाही ठप्प झाल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली असून, आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे.
पालिकेची बस सेवा बंद
पावसाच्या रौद्र रूपामुळे वसई-विरार महानगरपालिकेची परिवहन (बस) सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्त्यांवर कंबरभर पाणी साचल्यामुळे नागरिकांना कार्यालयातून घरी परतण्यासाठी किंवा सुरक्षित स्थळी जाण्यासाठी पायी चालण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. काही भागांत नागरिकांना प्रवास करण्यासाठी चक्क ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागला. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्न करत असले, तरी पावसाचा जोर कायम असल्याने यंत्रणांवर ताण पडत आहे.
