वसई: वसई विरार शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सखल भागात साचलेल्या पाण्याचा फटका दुकानदार, भाजी आणि फळ विक्रेते यांनाही बसला आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना पायी चालत साचलेल्या पाण्यातून किराणा आणावा लागत आहे.
वसई विरार शहरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे नालासोपाऱ्यातील गालानगर, संतोषभुवन, रेल्वे स्थानक परिसर, वसईतील बंगली, गिरीज, सातिवली, मधुबन, माणिकपूर विरारमधील विराटनगर, कुंभारपाडा, रेल्वे स्थानक परिसर, नारिंगी आणि नायगावमधील सखल भागातील परिसरात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्याचा फटका बाजारपेठ सखल भागात असलेली दुकाने यांनाही बसला आहे.
अनेक भागात दुकानात शिरलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे नजिकच्या दुकानात दैनंदिन वापराचे सामान उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना लांबच्या दुकानात पायपीट करावी लागत आहे. तसेच काही भागात स्थानिक विक्रेते आर्थिक नुकसान टाळण्यासाठी खांद्यावर सामान घेऊन घरोघरी त्याची विक्री करत आहे. तसेच शहरात वीजेचा आणि इंटरनेटचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ऑनलाईन सुविधा उपलब्ध असूनही नागरिकांना त्यांचा वापर करता येणे अशक्य होऊन बसले आहे.
