वसई: वसई विरार शहरात रविवार सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे रस्त्यांवर पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, असे असले तरी काल रात्री आणि पहाटे पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतरही नालासोपारा, वसई पूर्व परिसरातील अनेक भाग पाण्याखाली असल्याचे दिसून येत आहे.
वसई विरार शहरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे शहरातलं १०५ ठिकाणी पाणी साचले होते. तर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत काल ट्रॅक्टर ट्रॉली, अग्निशमन वाहने तसेच लाईफ बोटीद्वारे विविध ठिकाणांहून आतापर्यंत एकूण २१० नागरिकांची सुटका करण्यात आली. यात सकवार, खानीवडे टोलनाका येथे १९ जणांना, विराटनगर येथे ०५, मधुबन येथे ४१, निर्मळ येथे ३०, संतोषभुवन येथे १०, सुदामनगर, सनातन गौशाला, भोयदापाडा येथे १००, सातिवली ते आचोळे दरम्यान ०२ व वसई रेल्वे स्थानक ते वसई गाव दरम्यान ०३ अशा एकूण २१० जणांची सुटका अग्निशमन विभागाचे कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली. तसेच दरड प्रवण क्षेत्रातील नागरिक, धोकादायक इमारतींमधील नागरिकांना मनपाच्या तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वसईत १७९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सखल भागातील चाळी, इमरतींचे तळमजले, तसेच खाजण जमिनी (मिठागर) परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने दिसून येत आहे.
तर काल रात्री आणि आज पहाटे पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर १५ ते १६ तास उलटून गेल्यावरही काही भागातील पाणी ओसरलेले नाही. यात नालासोपारा पूर्वेतील तुळींज, आचोळे परिसर, सेंट्रल पार्क तसेच वसईतील सी कॉलनी, एच कॉलनी, दिवाणमान आणि नवयुग नगर परिसराचा समावेश आहे.
तसेच बैठ्या चाळी आणि इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळॆ दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान विभागाने आजही रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
