वसई:- वसई-विरार शहरात सलग पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून, संपूर्ण शहरात पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने पायी चालणेही अत्यंत धोकादायक बनले आहे.
या अतिवृष्टीमुळे विरार मधील ग्लोबल सिटी, पुष्पानगर, जुने विवा विद्यालय, बोळींज रस्ता आणि चंदनसार यासह अन्य भाग पाण्याखाली गेले आहेत. तर नालासोपारा मधील स्टेशन रोड, तुळींज रस्ता, नगिनदास पाडा, विजय नगर, वाकणपाडा, धानिव बाग, गालानगर, आचोळे आणि नालासोपारा एसटी डेपो परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. वसईतील देवतलाव, भुईगाव, अर्नाळा रस्ता, गिरीज, बंगली रस्ता, तसेच वसई पूर्वेच्या भागातील सातीवली, रेंज नाका, भोयदापाडा, गोखीवरे परिसर आणि एव्हरशाईन भागात पाण्याचा वेढा पाहायला मिळत आहे. याशिवाय, नायगाव पश्चिम, नायगाव पूर्वेच्या स्टार सिटी, सनटेक, पेररा नगर, वाकीपाडा, चिंचोटी कोल्ही आणि कामण भिवंडी रस्ता अशा अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
अनेकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जर पावसाचा जोर असाच राहात गेला, तर परिस्थिती आणखीन गंभीर होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नसल्यानेच पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी थेट रस्त्यांवर आणि लोकांच्या घरांत साचत असल्याचा तीव्र आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एकीकडे पावसाचा जोर कायम असताना, दुसरीकडे जलमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय यामुळे वसई-विरारकर प्रचंड हैराण झाले आहेत.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात कुठेही पाणी साचल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यासाठी पालिकेने १८००२३३४३५३ आणि १८००२६७३८९८ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ०२५०-२३३४५४६, ०२५०-२३३४५४७, ८६६९९७६१०१ आणि ७०५८९११९२५ हे दूरध्वनी क्रमांकही नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय महानगरपालिका भवनाच्या ०२५०-६६३०००० आणि २५२५१०१ ते ०६ या क्रमांकांवरही संपर्क साधता येणार आहे.
महापौरांकडून आढावा
महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी आज स्वतः विरार पूर्व आणि पश्चिम परिसरात उतरून साचलेल्या पाण्याचा आणि उद्भवलेल्या समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. शहरात रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मोठी गटारे असूनही, पाऊस आणि वैतरणा खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास नैसर्गिक अडथळा निर्माण होत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. सखल भागात साचलेले पाणी उपसण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने मदत करण्यासाठी त्यांनी पालिका प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
