वसई : वसई-विरार शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मागील दोन दिवसांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात तिघांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू तर एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

शहरात पावसाचा जोर कायम असल्याने सखल भागात पाणी साचले असून अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. पहिली घटना ३ जुलै रोजी वसई पूर्व येथील ‘सुरक्षा स्मार्ट सिटी’ परिसरात घडली. या ठिकाणी महावितरणकडून हायटेन्शन टॉवर बसवण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी संबंधित विभागाने परिसरात मोठे खड्डे खोदले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच पाण्यात सुमितकुमार सुरेश मंडल (२०) या तरुण मजुराचा या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.

​दुसरी घटना शनिवारी राजावळी वाघराळपाडा येथे घडली. मुसळधार पावसामुळे या भागातील नाल्यांना आणि रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. या पूरपरिस्थितीत पाण्यात पोहत असताना किशोर लोखंडे (५५) ही व्यक्ती अचानक बेपत्ता झाली. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे ते वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली होती. पाण्याचा प्रवाह आणि पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत होते, तरीही अथक प्रयत्नांनंतर किशोर लोखंडे यांचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले. शनिवारी रात्री नालासोपारा पूर्वेतील जीवननगर परिसरात पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली आहे.

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

नालासोपारा पूर्वेतील संतोषभुवन येथील श्री समर्थ चाळीत राहणाऱ्या वेदांत सावंत या २० वर्षीय तरुणाचा विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. घराच्या जवळच असलेल्या एका लोखंडी शिडीमध्ये अचानक वीज प्रवाह उतरला होता, पावसामुळे ती शिडी ओली झाली होती.याच दरम्यान अनवधानाने स्पर्श झाल्याने वेदांतला विजेचा जोरदार झटका बसला. या अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.