वसई: मुसळधार पावसामुळे नायगाव पश्चिम येथील साकाई नगर २, उमेळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे अनेक नागरिक तिथे अडकून पडले होते. या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिका अग्निशमन दलाचे रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तराफ्याच्या साहाय्याने अडकलेल्या सर्व नागरिकांची सुरक्षित सुटका केली. या मोहिमेदरम्यान अवघ्या तीन महिन्यांच्या बालकासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

मागील आठवडा भरापासून पावसाचा जोर कायम आहे. संपुर्ण शहर जलमय झाले असून अजूनही अनेक भागातील पाण्याची पातळी वाढत आहे.
नायगाव उमेळे येथील ​अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय उमेळे गावातील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली आहे. समुद्राची आणि जमिनीवरील पाण्याची पातळी एकसारखी झाल्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याचे नगरसेवक आशिष वर्तक यांनी सांगितले.

​दरम्यान, दुसरीकडे वसई पूर्वेच्या नवघर मिठागर वस्तीतही मुसळधार पावसामुळे पाणी साचले असून, तिथे अडकलेल्या नागरिकांचे अग्निशमन दलाच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मांडवी पोलिसांकडून पुरात अडकलेल्या २५ जणांची यशस्वी सुटका

​६ जुलै २०२६ रोजी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदीप भागातील तानसा नदीला पूर आला होता. या पुराच्या पाण्यात उमेश आणि एकता यांच्या फार्महाऊसमध्ये एकूण २५ नागरिक अडकले होते.

घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस, वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने संयुक्त बचाव मोहीम हाती घेतली. या विशेष मोहिमेत २३ पुरुष आणि २ महिला अशा सर्व २५ नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सर्वांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवण्यात आले असून पोलीस प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.