वसई:- नालासोपाऱ्यात मैदानात साचलेल्या पाण्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, वसई फाटा येथे गोरेगाव येथून आपल्या बहिणीला भेटायला आलेल्या एका २२ वर्षीय तरुणीचा नाल्यातील पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
कविता दूधनाथ जैस्वाल (२२) असे मृत तरुणीचे नाव असून, ती मूळची जौनपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होती आणि सध्या गोरेगाव मुंबई येथे राहत होती. वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना पायी चालताना खड्डे आणि उघड्या गटारांचा अंदाज येत नाहीये. कविता जैस्वाल ही गोरेगाववरून वसईला आपल्या बहिणीच्या घरी जात असताना, रस्त्यावरील पाण्याचा आणि उघड्या नाल्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ती थेट गटारात कोसळली.
कविता पाण्यात पडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की तिला बाहेर काढण्यात यश आले नाही. नागरिकांकडून तिला रेस्क्यू (बचाव) करतानाचा एक थरारक लाईव्ह व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओवरून पुराच्या पाण्याचा वेग आणि भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे.
कविता ही आपल्या बहिणीसोबत जात असताना तिचा पाय घसरून ती पाण्याच्या प्रवाहात पडली. तिला वाचवण्यासाठी तिच्या बहिणीने व नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नाका-तोंडात पाणी गेल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी दिली. वसई-विरार परिसरात या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे.
