वसई: वसई-विरार शहराला गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात तब्बल ५०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वेवरील विरार ते चर्चगेट दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

​रेल्वे प्रशासनाकडून लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून लोकल केवळ वसई स्टेशनपर्यंतच चालवल्या जात आहेत. यामुळे विरार आणि नालासोपारा भागात राहणाऱ्या लाखो नोकरदार व नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. कामावर जाण्यासाठी निघालेले नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. वाहतुकीचे इतर पर्यायही ठप्प झाल्याने नागरिकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

​वसई ते नालासोपारा दरम्यान कोणतीही वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने, संतप्त आणि हताश झालेले काही प्रवासी थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रुळांवर कंबरभर तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेले असतानाही, नागरिक त्याच पाण्यातून वाट काढत धोकादायक पद्धतीने ये-जा करत आहेत.

​पाण्याचा अंदाज न आल्यास रुळांमधील खड्ड्यांत पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, अचानक एखादी लोकल किंवा मालगाडी आल्यास प्रवाशांच्या जिवाला थेट धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता ही व्यक्त केली जात आहे.

कामावर जाणे गरजेचे असले, तरी असा प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे,” अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे आणि प्रवाशांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रशासन नागरिकांना वारंवार रेल्वे रुळांवर न उतरण्याचे आवाहन करत आहे.