वसई: वसई विरार शहरात पावसाचा जोर वाढतच महावितरणकडून केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यावर देखील त्याचा परिणाम झाला आहे. शहरातील काही भागात काल रात्रीपासूनच वीजेचा लपंडाव सुरू झाला आहे. तर वीजेविना दैनंदिन कामांचा खोळंबा झाल्यामुळे नागरिकही हैराण झाले आहे. पालघर जिल्ह्यात हवामान विभागाने जारी केलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर वसई विरार परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

तर याचा सर्वात मोठा फटका येथील वीजपुरवठ्याला बसला आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आणि सुरक्षेचा उपाय म्हणून महावितरणकडून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, ज्यामुळे हजारो नागरिकांना तासंतास अंधारात राहावे लागत आहे.वसई, नालासोपारा आणि विरारमधील मुख्य रस्ते आणि सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.

नालासोपारा येथील गाला नगर, रेल्वे स्थानक परिसर, वसई पूर्वेकडील मालजीपाडा आणि ससूनवघर या भागात अनेक फुटांपर्यंत पाणी साचले आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या तळमजल्यात आणि महावितरणच्या सब-स्टेशन्स तसेच रोहित्रांच्या परिसरात पाणी साचल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्यात वीज प्रवाहित होऊन कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही परिसरांतील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा

पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडल्याने मुख्य वीज वाहिन्या तुटल्या आहेत, तर काही भागांत तांत्रिक बिघाडामुळे रोहित्रे बंद पडली आहेत. रस्त्यांवर आणि वीज केंद्रांभोवती मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना वीज उपकरणांच्या माध्यमातून दैनंदिन कामे करणे कठीण झाले आहे. तर, मुसळधार पावसामुळे घरून काम करणाऱ्या (वर्क फ्रॉम होम) चाकरमान्यांच्या कामातही व्यत्यय निर्माण होत आहे.