वसई: वसई-विरार शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून संपूर्ण शहर जलमय झाले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी महावितरणने अनेक भागांतील वीज पुरवठा खबरदारी म्हणून खंडित केला आहे. मात्र, यामुळे नागरिकांना गेल्या ३० तासांहून अधिक काळ अंधारात राहावे लागत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

​वसई-विरार शहरात महावितरणतर्फे साडेदहा लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, मागील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने अनेक इमारतींच्या आवारात आणि रस्त्यांवर पाणी साचले आहे. या पुराचा थेट फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. वसई पश्चिमेकडील सनसिटी येथील मुख्य उपकेंद्र पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. याशिवाय, शहरातील अनेक ठिकाणचे रोहित्र आणि वीज पेट्या पाण्यात बुडाल्याने वीज पुरवठा ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रोहित्र फुटले आहेत, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज वाहक तारा आणि खांब कोसळून महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा तातपुरता खंडित करण्यात आला असल्याचे महावितरण कडून सांगण्यात येत आहे.

​३० तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित

​शहरातील अनेक भागांत रविवार दुपारपासून गेलेली वीज अजूनही आलेली नाही. ३० तासांपेक्षा जास्त काळ वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. वीज नसल्यामुळे मोबाईल टॉवर्स बंद पडून इंटरनेट व नेटवर्क सेवा विस्कळीत झाली आहे.वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचे ऑनलाइन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

वीज यंत्रणा उंचावर बसविण्याची मागणी

वसई विरार भागात वीज पुरवठा करण्यासाठी रोहित्र, आरओमी, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स अशा यंत्रणा बसविल्या आहेत. काही ठिकाणी या खाली असल्याने अशा भागात पाणी साचताच त्या बंद कराव्या लागत आहेत.यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांचे हाल होत आहेत यासाठी त्या उंच कराव्यात अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.