वसई: वसई विरार शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांचा खोळंबा झाला असून वसई रेल्वे स्थानकात मोबाईल चार्ज करण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

वसई विरार शहरात गेल्या पाच ते सहा दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक भागात वीजेचा लपंडाव सुरू आहे. वीज तारांवर उन्मळून पडणारी झाडं, वाऱ्याच्या वेगामुळे वीजवाहिन्या तुटणे, वीजपेट्यांमध्ये झालेला बिघाड, रोहित्रांचे स्फोट तर काही ठिकाणी वीजपेट्या आणि रोहित्रांच्या परिसरात काठोकाठ साचलेले पावसाचे पाणी अशा विविध कारणांमुळे महावितरणकडून शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

परिणामी नालासोपारा, वसई पूर्व, विरार पूर्व तसेच ग्रामीण भागांना याचा सर्वाधिक फटका बसला असून नागरिकांना १० ते १२ तास सलग वीजेविना काढावे लागत आहेत. तर दुसरीकडे वीज नसल्यामुळे मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या उपकरणांना चार्जिंग नसल्यामुळे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रशासनाला संपर्क साधणेही नागरिकांना कठीण होऊन बसले आहे.

रोहित्र फुटल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सातिवली परिसरातील वीज पुरवठा बंद झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता नवे बसवायला वेळ लागेल. त्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले असल्याचे देविदास केंगार यांनी सांगितले.

तर सलग १२-१२ तास वीज नसल्यामुळे मंगळवारी अखेर नागरिकांनी मोबाईल चार्ज करण्यासाठी वसई रेल्वे स्थानक गाठल्याचे दिसून आले. मोकळ्या स्विच बोर्डाला एक्स्टेंशन बोर्ड जोडून एकावेळी २ ते ४ जणांचे मोबाईल चार्जिंगला लावत असल्याचे, मनोज यादव यांनी सांगितले. तर प्रत्येकाच्या मोबाईलला थोडी थोडी चार्जिंग होईपर्यंत आम्ही वाट पाहतो. मोबाईल चार्ज करण्यासाठी सकाळपासून आम्ही इथे घोळका करून उभे असल्याचे विजय साहू यांनी म्हटले.

सलग दुसऱ्या दिवशी इंटरनेट गायब

वसई विरार शहरात रविवारपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शहरात वीजेसह इंटरनेटही गायब झाले आहे. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे मोबाईल रेंज नसल्यामुळे शहरातील नागरिकांचा इतर शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे.