वसई : शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जागोजागी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. हाच धोका ओळखून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ४ जुलै ते ९ जुलै या कालावधीत शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. आता पाणी ओसरल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत.

वसई-विरार शहरात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आता नियंत्रणात आली आहे. गेल्या पाच दिवसांत शहरात तब्बल १ हजार १४२ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती. या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.

वसई-विरार क्षेत्रात जिल्हा परिषद, खासगी शाळा आणि महाविद्यालये मिळून एक हजाराहून अधिक शैक्षणिक संस्था आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गेल्या ६ दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्या होत्या. ​गुरुवारपासून शहरात पावसाने सुदैवाने उसंत घेतली आहे. पाऊस थांबल्यामुळे शहरातील विविध भागांत साचलेले पुराचे पाणी आता हळूहळू ओसरले आहे. वाहतूक आणि इतर नागरी सुविधा सुरळीत झाल्याने शहरातील जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे. परिणामी, मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये शुक्रवार १० जुलै पासून विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा गजबजली असून शैक्षणिक कामकाज नियमित सुरू झाले आहे.

​महापालिकेकडून ३५० हून अधिक शाळांचे निर्जंतुकीकरण

​पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर शहरात साथीचे आजार पसरू नयेत म्हणून वसई-विरार शहर महानगरपालिकेने स्वच्छता मोहिमेला प्राधान्य दिले आहे. पाऊस थांबताच पालिकेच्या आरोग्य विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शहरातील ३५० हून अधिक शाळांची स्वच्छता करण्यात आली असून, त्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.​प्रशासनाने घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे आणि स्वच्छता मोहिमेमुळे पालकांनी आणि शाळा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.