वसई:वसई-विरार शहरात रविवारी सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गेल्या २४ तासांत शहरात ७० पेक्षा अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
झाडे कोसळल्यामुळे काही ठिकाणी घरांचे आणि चाळींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच, काही भागांत झाडे वीजवाहिन्यांवर पडल्याने तारा तुटल्या असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरात झाड अंगावर कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे सतत सुरू असलेल्या या पाऊस आणि वाऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यांवर आणि घरांवर कोसळलेली झाडे कटर मशीनच्या साहाय्याने कापून बाजूला करण्यात आली असून, वाहतुकीसाठी रस्ते आणि परिसर मोकळा करण्यात आला आहे.
