वसई: गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार शहरात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. या महापुरासारख्या परिस्थितीमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून गेल्या दोन दिवसांपासून पालिकेची परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. मंगळवारी पूर्वेच्या काही भागातील पुराचे पाणी काहीसे ओसरल्यानंतर मर्यादित स्वरूपात सेवा सुरू केली आहे. सद्यस्थितीत पाच मार्गावर केवळ १६ बसेस चालविल्या जात आहेत. मात्र अन्य ठिकाणी प्रवाशांचे हाल कायम आहेत.
वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागाकडून बससेवा पुरवली जाते. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. तसेच ४० ई बस चा समावेश आहे. दररोज बसेस मधून ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात.
मागील दोन दिवसांपासून वसई विरार शहरात वादळीवाऱ्यासह तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते ही जलमय झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवा ही ठप्प झाली आहे. परिवहन सेवेच्या बसेस ही बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
मंगळवारी पूर्वेच्या काही भागात पाणी ओसरले आहे. त्यामुळे येथील काही मार्गावर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सद्यस्थितीत पाच ठिकाणच्या मार्गावर १६ बसेस चालविल्या जात असल्याची माहिती महापालिकेच्या परिवहन विभागाने दिली आहे.
एकीकडे पूर्वेकडील भागात संथ गतीने बससेवा सुरू होत असताना, पश्चिमेकडील परिस्थिती मात्र अत्यंत गंभीर आहे. तब्बल २० तास उलटून गेल्यानंतरही वसई-विरारचा पश्चिमेकडील परिसर अजूनही जलमय आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले असल्यामुळे या भागातील परिवहन सेवा अद्यापही पूर्णपणे ठप्प आहे.
या मार्गावर बस सेवा सुरू
मार्ग क्र. १०१ (सातीवली): ०३ बसेस
मार्ग क्र. १०२ (वसई फाटा): ०४ बसेस
मार्ग क्र. ३०२ (फुलपाडा): ०२ बसेस
मार्ग क्र. ३१० (चांदीप – शिरसाड): ०५ बसेस
मार्ग क्र. ३३० (विरार ते द्वारकाधीश मंदिर): ०२ बसेस
