वसई: वसई विरार शहरातील अंतर्गत मार्गांवर प्रवास करण्यासाठी बहुतांश प्रवासी दैनंदिन पालिकेच्या परिवहन विभागाच्या बसने प्रवास करतात. मात्र, तुंबलेले रस्ते आणि बसेसमध्ये शिरलेले पाणी यामुळे परिवहन सेवा पुरती कोलमडली असून प्रवाशांवर पायी चालत घर गाठण्याची वेळ ओढवली आहे.
वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत शहरातील ३६ मार्गांवर बससेवा पुरवली जाते. यात एकूण ४० इलेक्ट्रिक आणि ८० डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या बसेसचा समावेश आहे. शाळकरी विद्यार्थी, औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांमध्ये नोकरी करणारा मजूर वर्ग, चाकरमानी, महिला, वृद्ध दररोज या बसेसमधून प्रवास करतात.
मात्र, शनिवारी शहरात कोसळलेला मुसळधार पाऊस आणि रस्त्यांवर साचलेले पाणी यामुळे परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही ठिकाणी अचानक परिवहनच्या बसेस बंद पडल्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत घरचा रस्ता गाठावा लागला.
याबाबत बोलताना, वसई फाटा या परिसरात बस बंद पडल्यामुळे बरेच प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. शेवटी बस सुरू न झाल्यामुळे नागरिकांना वसंत नगरीपर्यंत चालत यावे लागले, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. तर यासंबंधी परिवहन विभागाशी संपर्क साधला असता, पश्चिम परिसरातील बससेवा दुपारी १.३० वाजेपर्यंत व पूर्वेतील बससेवा सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुरू होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
