वसई: वसई विरार शहरात गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या पावसाने बुधवारी काहीशी उसंत घेतली. यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी पाणी ओसरलेल्या भागात महापालिकेकडून १२ बस सुरू करण्यात आल्या.

वसई-विरार शहरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असून नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र, बुधवारी पाऊस थांबल्याने आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांची आणि नोकरदारांची गैरसोय टाळण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाकडून अत्यावश्यक प्रवासासाठी शहरात विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.

पावसामुळे रेल्वे स्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांवर निर्माण झालेली परिस्थिती पाहता पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही विभागांना जोडणाऱ्या मार्गांवर या बसेस चालवल्या जात आहेत. वसई पूर्व भागात रेल्वे स्थानकावरून सातिवली आणि वसई फाटा या मार्गांवर प्रत्येकी ३ बसेस तर दुसरीकडे वसई पश्चिम भागात वसई रेल्वे स्थानक ते किल्लाबंदर आणि भुईगाव दरम्यान प्रत्येकी २ बसेस चालवल्या जात आहेत. तसेच पाचू बंदर आणि भास्कर आळी या अंतर्गत भागातील नागरिकांसाठी प्रत्येकी १ बस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रस्त्यांवर साचलेले पाणी आणि पावसामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन या बसेसच्या संख्येत किंवा मार्गांमध्ये गरजेनुसार आणखी बदल अथवा वाढ करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.