वसई: वसई विरार शहरात शनिवार सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक सेवा कोलमडल्यामुळे नागरिकांना चक्क ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागत आहे.
पालघर जिल्ह्यात आज हवामान विभागाने मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार सकाळपासूनच मेघगर्जनांसह पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेसे मार्ग नसल्याने वसईतील आक्टन, गिरीज, बंगली, दीनदयाल नगर, रेंज ऑफिस, तुंगारेश्वर, सातिवली, मधुबन, विरारमधील राजोडी, उंबरगोठण, कुंभारपाडा, विराटनगर, ग्लोबल सिटी, नालासोपाऱ्यातील गास, निर्मळ, गालानगर, संतोषभुवन, रेल्वे स्थानक परिसर, आणि नायगाव येथील कोळीवाडा, सनटेक आणि रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
गुडघाभर साचलेल्या पाण्यातून दुचाकीचालकच नव्हे तर चारचाकी चालक, रिक्षा आणि अगदी परिवहनच्या बस चालकांना देखील मार्ग काढणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणारे, गावपाड्यातून तसेच शहराच्या अंतर्गत भागातून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे यामुळे हाल होत आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी चाकरमान्यांना मात्र कार्यालय गाठावे लागत आहे. त्यामुळे आता कामावर जाणारे आणि कामावरून परतणाऱ्या नागरिकांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागत आहे.
गेल्यावर्षी सुद्धा ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे परिवहन सेवेवर अशाच पद्धतीने परिणाम झाला होता. त्यामुळे नागरिकांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागला होता.
