वसई-विरार शहराला सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासांत वसईत तब्बल १२४ मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे अनेक सखल भागांसह मुख्य आणि अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गुरुवारी सायंकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली होती; मात्र, शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू केल्याने अनेक भागातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते आणि सखल भाग पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.
वसई पश्चिमेकडील गिरीज गावातील बदामी स्टॉप परिसराला या पावसामुळे अक्षरशः समुद्राचे स्वरूप आले आहे. विशेष बाब म्हणजे या परिसरात सहसा कधीही पाणी साचत नाही, मात्र यंदाच्या मुसळधार पावसामुळे हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
नालासोपारा पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून रस्त्यावरील पाणी ओसरलेले नाही. यामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांचे कमालीचे हाल होत आहेत. नालासोपारा स्टेशन परिसर, वाकणपाडा, धानिव बाग, गाला नगर, संतोष भवन, अंबापाडा, प्रगती नगर, जुने विवा कॉलेज, चंदनसार, मनवेलपाडा, सातिवली, मोरया नाका, निर्मळ-नालासोपारा रस्ता आणि दिवाणमान यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे.
तर वसई पूर्वेतील महामार्गाला लागून असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये देखील पाणी साचून राहिल्याने चाकरमानी आणि स्थानिकांचे हाल झाले आहेत. या भागातील अरुंद गटारे आणि त्यांची अपुरी सफाई या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
ग्रामपंचायत काळात या भागात गटार बांधण्यात आले होते. परंतु, ते गटार अरुंद असल्या कारणाने त्यांची स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नाही. अनेकदा नवीन गटर बांधण्यासाठी विनंती करूनसुद्धा गटार बांधण्यात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया देविदास केंगार यांनी दिली.
तर, वसई पश्चिमेतील बंगली आणि गिरीज येथील समस्येबाबत बोलताना, स्थानिक रहिवासी स्टॅन्ली गोन्साल्विस म्हणाले की, शुक्रवारी कालच्यापेक्षा जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे आजही अनेक रस्ते जलमय झाले आहेत. कचरा टाकून बुजलेली बावखले ओसंडून वाहात आहेत. सागरशेत रवि जाधव चौकापासूनचा रस्ता, पुढे ओळंबवाडी पर्यंतचा रस्ता, देवतलाव- अर्नाळा रस्ता बदामी स्टॉपपर्यंतचा भाग पूर्णपणे जलमय झाला आहे. गटारांतून पाण्याचा निचराच होत नाही. तर पापडीच्या शुक्रवारच्या आठवडी बाजाराला आज अतिवृष्टीमुळे अवकळा आली आहे.
