वसई: पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम असून, हवामान विभागाने गुरुवारी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. सुरक्षेची खबरदारी म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

​सतत होणाऱ्या या पावसामुळे वसई-विरार शहरातील सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही भागांतील पाणी अद्याप ओसरले नसल्याने नागरिकांना आणि प्रवाशांना साचलेल्या पाण्यातूनच प्रवास करावा लागत आहे. विशेषतः नालासोपारा येथील गाला नगर, रेल्वे स्टेशन परिसर यासह अनेक भाग पूर्णपणे जलमय झाले आहेत.

​रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्यामुळे प्रवाशांना रिक्षा मिळवण्यासाठी तासनतास लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. ​

वसई तहसील विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आठ विभागांमध्ये एकूण ७५८ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याची सरासरी ९४.७५ मिमी इतकी आहे. पुढील २४ तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.