वसई: वसई विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी नागरिकांना सलग सातव्या दिवशी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा आधार घ्यावा लागत आहे.

वसई विरार शहरात गेल्या आठवडाभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दहा दिवसात सोमवारी, ६ जुलै रोजी सर्वाधिक म्हणजे ३२५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तर गेल्या २४ तासात शहरात सरासरी १८२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार कोसळणारा पाऊस, पाण्याचा निचरा होणाऱ्या नैसर्गिक मार्गांवर झालेले अतिक्रमण, पाणथळ जागांवर वाढलेले बांधकामे आणि तकलादू नालेसफाई यामुळे सलग चार ते पाच दिवस शहरातील सखल भाग तसेच मुख्य वाहतुकीचे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.

शहरातील न ओसरणाऱ्या पावसाच्या पाण्याचा फटका शहरातील वाहतुकीलाही बसला आहे. प्रमुख रस्त्यांवर दोन-दोन ते तीन-तीन फुटांहून अधिक पाणी साचले असून खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक यंत्रणा ठप्प झाली आहे. अशा परिस्थिती एरवी शेतीकामांसाठी वापरले जाणारे आणि इतर वाहनांच्या तुलनेने उंच असणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली वाहतुकीची मुख्य साधने ठरत आहेत.

दररोज संध्याकाळी आणि सकाळी रेल्वे स्थानक, बस आगार महामार्ग आणि जोडरस्ते अशा विविध ठिकाणी चाकरमान्यांची ने-आण करण्यासाठी रिक्षांप्रमाणे दोन ते तीन ट्रॅक्टर रांगेत उभे असल्याचे चित्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाहायला मिळत आहे. या ट्रॅक्टरमधून प्रवास करण्यासाठी प्रतिसीट ४० ते ५० प्रवाशांना मोजावे लागत आहेत.

मात्र, साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांप्रमाणे या ट्रॅक्टर चालकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्यातून जाताना अनेकदा टायर पंक्चर होणे, खोल पाण्यात तांत्रिक कारणाने ट्रॅक्टर नादुरुस्त होणे, अशा विविध समस्या उद्भवत असल्याचे ट्रॅक्टर चालकांनी सांगितले.

रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

रेल्वे रुळांवर पाणी साचत असल्यामुळे वसईपर्यंतच लोकल चालवल्या जात आहेत. यामुळे अनेकांवर रेल्वे रुळांवरून पायी चालत घर गाठण्याची वेळ ओढवली आहे. तर काही ट्रॅक्टर चालकांनी अशा प्रवाशांसाठी नालासोपारा, विरारपर्यंत रेल्वे सेवा सुरू केली आहे. मात्र, वसईहून नालासोपारा किंवा विरारला सोडण्यासाठी ४०० ते ५०० रुपये प्रतिसीट आकारले जात असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले आहे. तर जोखीम पत्करून पुराच्या पाण्यातून वाहन चालवत असल्यामुळे इतकी रक्कम आकारात असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.