वसई– गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहर सलग तिसऱ्या दिवशीही पूर्णपणे जलमय झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आणि पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात तब्बल २१५ मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे संपूर्ण परिसराला पूरपरिस्थितीचे स्वरूप आले आहे.
या वेळच्या पूरपरिस्थितीचे मुख्य कारण म्हणजे समुद्राला आलेली भरती आणि खाड्या तसेच मोठ्या नाल्यांची पाण्याची पातळी समसमान झाली आहे. यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होण्यास मोठे अडथळे निर्माण होत आहेत. पाऊस थांबूनही सखल भागातील पाणी ओसरत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
वसई, नायगाव, नालासोपारा आणि विरारमधील बहुतांश सखल भाग, रस्ते आणि अनेक गृहसंकुले (सोसायट्या) पाण्याखाली गेली आहेत. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचल्याने नागरिकांना घरातच अडकून पडावे लागले आहे. दळणवळणाचे सर्व मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाल्याने, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना साचलेल्या पाण्यातूनच जीवघेणी पायपीट करावी लागत आहे.
पूरपरिस्थितीमुळे शहरातील गटारे आणि नाले ओसंडून वाहत आहेत. हे दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी रस्त्यांवर तसेच लोकांच्या घरांच्या आवारात आल्यामुळे परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे, बाजारपेठा बंद असल्याने आणि वाहतूक ठप्प झाल्याने दूध, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत
वसई-विरारकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे सेवाही या पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने विस्कळीत झाली आहे. रेल्वे वाहतूक मंदावल्याने किंवा काही काळ ठप्प झाल्याने नोकरदार आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुख्य रस्त्यांवरूनही पाणी वाहत असल्याने रिक्षा आणि बस वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे.
