वसई:- वसई-विरार शहराचा समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा दर्शवण्यासाठी शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांवर आकर्षक आणि भव्य स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत शहराच्या प्रवेशद्वारांच्या सुशोभीकरणाचा आणि ओळखीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून वसई किंवा विरार शहरात प्रवेश करताना महापालिकेची हद्द दर्शवण्यासाठी या कमानी उभारण्यात याव्यात, अशी मागणी बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) नगरसेविका दीपा पाटील यांनी केली.
ससूनवघर येथून वसई-विरार शहराची हद्द सुरू होते, मात्र तेथे शहराची ओळख स्पष्ट करणारे कोणतेही प्रवेशद्वार नाही. वसई-विरारला श्रीमंत ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असून, नरवीर चिमाजी आप्पा आणि वसईच्या ऐतिहासिक विजयाची ओळख या भूमीशी जोडलेली आहे. त्यामुळे या स्वागत कमानींमध्ये चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची आणि वसईच्या ऐतिहासिक वारशाची झलक दिसावी, जेणेकरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना शहराच्या गौरवशाली इतिहासाची माहिती मिळेल, असे दीपा पाटील यांनी नमूद केले.
गेल्या काही काळापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे शहराच्या विकासाची अनेक कामे प्रलंबित होती. आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या विकासाला गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय महामार्गावर हॉटेल्सचे मोठे जाळे असल्यामुळे शहराची खरी ओळख कुठेतरी हरवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ससूनवघर किंवा इतर गावांकडे जाताना टॅक्सीचालकांना रस्ता सांगताना हॉटेल्सची नावे द्यावी लागतात, ही स्थिती बदलण्यासाठी मुख्य रस्त्यांवर गावांची माहिती दर्शवणारे फलक लावणे अत्यंत गरजेचे आहे.
या महत्त्वाच्या मुद्द्यावर उत्तर देताना महापौर अजीव पाटील यांनी सांगितले की, शहराच्या हद्दीत ससूनवघर, कामण, भिवंडी आणि खानिवडे असे चार मुख्य प्रवेश मार्ग आहेत. भविष्यात या चारही ठिकाणी टप्प्याटप्प्याने भव्य प्रवेशद्वारे उभारण्याचा महापालिका सकारात्मक विचार करत आहे. तसेच शहराची मूळ ओळख जपण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक गावाची माहिती दर्शवणारे मार्गदर्शक बोर्ड लवकरच लावले जातील, असे आश्वासन महापौरांनी दिले.
