वसई: वसई विरार मधील विविध ठिकाणच्या शहरी व ग्रामीण भागात होळी व धुळवड उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सोमवारी होळ्यांचे दहन करण्यात आले तर मंगळवारी वसई विरारकरांनी एकमेकांना रंगलावून धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. विशेषतः अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने होळीउत्सव साजरा करण्यात आला.
होळीचा सण हा रंगाचा आनंद द्विगुणित करणारा सण आहे .या सणांचे महत्त्व जपण्यासाठी सोमवारी होळी पौर्णिमेनिमित्त वसई , जूचंद्र, नारंगी, नायगाव कोळीवाडा, कामण, पोमण गोखीवरे, विरार, मालजीपाडा, खानिवडे, कोळीवाडे यासह इतर ठिकाणच्या गावागावात पारंपारिक पद्धतीने होळया उभारण्यात आल्या होत्या. या होळीच्या निमित्ताने लहान मुले, महिला वर्ग, पुरुष मंडळी पारंपरिक पेहरावात सार्वजनिक ठिकाणच्या होळी उत्सवात सहभागी झाले. गावातील नवविवाहित दांपत्यही होळी भोवती फेऱ्या मारताना दिसून आले.
तर होळीचे पूजन झाल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी सर्वांचीच झुंबड उडाली होती. तसेच रात्री विविध ठिकाणी मनोरंजनात्मक खेळ, नृत्य, होळीची पारंपरिक गीते, नाट्यमय कार्यक्रम सादर करण्यात आले या कार्यक्रमात अनेकांनी विविध प्रकारच्या परितोषिकांची लयलूटही केली.
तसेच होळी नंतरच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विविध ठिकाणी सकाळपासूनच धुलीवंदनला सुरुवात झाली.
अबालवृध्दांनी एकमेकांना रंगलावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. यात तरूणाई आघाडीवर होती. होळकऱ्यांचे घोळके ढोलताशे वाजवत गल्लोगल्ली रंग उधळत फिरत होते. लहानमुलांच्या हातात पिचकारी तर तरूणाईच्या हातात सुके रंग होते. हे रंग घेऊन एकमेकांवर रंगांची उधळण करीत होते. याशिवाय काही होळकऱ्यांचे जमाव नाक्यावर व चौकात सर्वांना रंगविण्यासाठी सज्ज होते. या रंगात अगदी ओळखीचे चेहरेही रंगल्यामुळे अनोळखी झाले होते. तसेच अनेक ठिकाजी डीजेच्या व ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला होता.
वसईच्या शहरी व ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत होळीच्या शुभेच्छा दिल्या तर काहीजण शिमग्याची विविध प्रकारची सोंगे करून गावा गावात नाचताना दिसून आले. यंदाच्या वर्षी अनेकांनी धुलीवंदनला घातक व रासायनिक रंगाचा वापर न करता साधे नैसर्गिक रंग, पाण्याचे फुगे याचा वापर करून होळी व धुळवड साजरी करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
होळी आणि धुलीवंदनाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वसई विरार मीरा भाईंदरमध्ये पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.धुळवडीच्या निमित्ताने काहीजण मद्यपान करून वाहने चालवितात यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदीसुद्धा लावली होती. याशिवाय समुद्र किनाऱ्यावर अतिउत्साही पर्यटकांनी दारू पिऊन पाण्यात जाऊ नये, यासाठी त्यावर लक्ष ठेवत काही ठिकाणी मज्जाव करण्यात आला होता. पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता होळीचा सण उत्साहात साजरा झाला.
सामाजिक संदेश देणारी अनोखी होळी
वसई विरार शहरात पारंपरिक होळीसह काही ठिकाणी सामाजिक संदेश देणाऱ्या होळीसुद्धा उभारण्यात आल्या होत्या. यात विरारच्या चाणक्य उत्कर्ष मंडळाने सायबर गुन्ह्याशी संबधित जनजागृती करणारी होळी उभारली होती. या होळीला त्यांनी डिजिटल राक्षस असे नावही दिले होते.
