वसई: वसई विरार शहरात जनगणनेच्या १६ एप्रिलपासून घरगणनेला सुरुवात झाली आहे. १४ जून ही घरगणनेसाठी शेवटची तारीख असून आतापर्यंत शहरातील ६० टक्के घरगणना पूर्ण झाली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
२०११ साली पार पडलेल्या १४ वर्षांनी देशातील १६वी जनगणना पार पडत आहे. देशातील ही पहिलीच जनगणना असून तिला ‘जनगणना २०२७’ असे संबोधण्यात येत आहे. ही जनगणना एकूण दोन टप्प्यात विभागण्यात आली असून वर्ष २०२६ मध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी गटानुसार व घरगणना माहिती संकलित केली जात आहे. तर वर्ष २०२७ मध्ये पार पडणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना व नागरिकांची इतर माहिती संकलित केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यातील स्वगणनेसाठी ०१ मे २०२६ ते १५ मे २०२६ हा कालावधी देण्यात होता. यात नागरिकांना se.census.gov.in या संकेतस्थळावर घरांची स्थिती, कुटुंबाची माहिती तसेच कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी याबाबत विचारण्यात आलेल्या ३४ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. तर १६ मे पासून घरगणना नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जी १४ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
वसई विरार महापालिकेकडून जनगणनेसाठी ३ हजार ९०८ प्रगणक आणि ७१७ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रगणांकडून ९ प्रभागात जनगणना केली जात असून प्रत्येक प्रगणकाला एक ब्लॉक नेमून देण्यात आला आहे. ज्यात साधारणतः २०० घरांचा समावेश आहे. वसई विरारमध्ये घरगणनेचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत शहरातील सुमारे ६० टक्के घरांची नोंदणी पूर्ण झाली असल्याची माहिती उप-आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी हर्षला राणे यांनी दिली आहे.
