वसई: वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील वाढत्या अनधिकृत बांधकामांविरोधात आता प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई आगामी काळात अधिक तीव्र केली जाईल, असा सज्जड इशारा वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिला आहे. या मोहिमेमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात छुप्या मार्गाने अनधिकृत चाळी व बांधकामे उभारली जात आहेत. दिवसेंदिवस या अनधिकृत बांधकामांचे प्रमाण ही वाढत आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे तर दुसरीकडे पायाभूत सोयीसुविधांवर त्याचा ताण येत आहे.
विशेषतः सर्वाधिक अनधिकृत बांधकामे शहराच्या पूर्व पट्टीच्या भागात होत आहेत. या वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी खुद्द महापालिकेनेच आता कंबर कसली आहे.
नियमित कारवाई सुरू असली तरी ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल असे महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी सांगितले आहे. विशेषतः नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार आणि वसई पूर्वेच्या वालीव या भागात विशेष पथके नियुक्त केली जाणार आहे. सातत्याने या भागातून तक्रारी येत असतात त्यावर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याचे ही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी गुंतवताना ती इमारत किंवा जागा पालिकेच्या नियमांनुसार अधिकृत आहे का, याची शहानिशा करूनच खरेदी करावी. कोणत्याही अनधिकृत बांधकामाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
१८ हजार चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त
वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत २६ आणि २७ मे २०२६ रोजी आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार धडक कारवाई करत एकूण १८ हजार ४०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या मोहिमेत बापाणे एस.एम.के इंडस्ट्री येथील ५,७५० चौ. फुटांचे ३ पोटमाले, कामण ए १ इंडस्ट्री येथील ९,४०० चौ. फुटांचे लोखंडी पत्राशेड, कामण गाव नाका येथील २५० चौ. फुटांची रूम, देवदळ सागपाडा येथील ५०० चौ. फुटांच्या २ रूम आणि वालीव अप्पा मैदान येथील २,५०० चौ. फुटांचे बांबूशेड व एक अतिरिक्त शेड तोडण्यात आले; तसेच फादरवाडी रेल्वे पुलाखालील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. ही धडक कारवाई प्रभाग समिती ‘जी’चे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे, अतिक्रमण विभाग प्रमुख मनोज घरत, कनिष्ठ अभियंता मयुरेश पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
