वसई- विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अनधिकृत भंगार दुकाने आणि गोदामांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मुख्य रस्ते, नाले आणि चक्क नागरीवस्तीच्या भागात ही भंगार दुकाने थाटली जात आहेत. अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षापासून वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्यातच शहरातील विविध ठिकाणच्या भागात भंगाराची दुकाने व गोदामे उभी राहत आहेत. काही वेळा हे भंगार साहित्य रस्त्यावरच व ये जा करण्याच्या मार्गातच अस्ताव्यस्त अवस्थेत पडून असते. मागील काही दिवसांपूर्वी नालासोपारा, पेल्हार, गोखीवरे या भागात भंगार दुकानांना आगी लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या.
सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने भंगाराच्या ठिकाणच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकताच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय महासभेत ही शहरातील वाढत्या अनधिकृत भंगार दुकानांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. भंगारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य व अन्य साहित्य असते अशा वेळी आग लागल्यानंतर मोठ्या अडचणी येत असतात.
विशेषतः ही दुकाने नागरी वस्तीत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो असे नगरसेवक पंकज पाटील यांनी सांगितले. अशा दुकानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रशासनाने सकारात्मक विचार करावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.अशी अनधिकृत पणे भंगार दुकाने असतील त्यांची पाहणी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
नागरी आरोग्यावर ही परिणाम
वाढत्या अनधिकृत भंगार दुकानांमुळे आरोग्याच्या समस्या ही निर्माण होत आहेत. काही वेळा भंगारातील टाकाऊ वस्तूवर प्रक्रिया करताना किंवा तांबे काढण्यासाठी वायर जाळल्या जातात, त्यातून विषारी धूर पसरून प्रदूषण निर्माण होत आहे. तर काही वेळा भंगार वाले टाकाऊ वस्तू ही रस्त्याच्या कडेला टाकून देतात. पावसाळ्यात या उघड्यावरील भंगार साहित्यात पाणी साचून डासांची पैदास होते, ज्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढतो अशा विविध मार्गाने नागरी आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे असे नागरिकांनी सांगितले आहे.
भंगार दुकानांचे सर्वेक्षण करा
शहरात वाढती भंगाराची दुकाने वाढत असून कोणत्याही प्रकारचे नियम त्यांच्यामार्फत पाळले जात नाहीत. अशा भंगार दुकानांना शिस्त लागावी यासाठी दुकानांचे सर्वेक्षण करून नियम व अटींच्या आधारे महापालिकेने परवाने उपलब्ध करून त्यांना ही कराची आकारणी करावी अशी मागणी सभागृह नेते प्रफुल्ल साने यांनी केली आहे. याबाबत महापौर अजीव पाटील यांनी प्रशासनाला यावर योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना महासभेत केल्या आहेत.
