वसई: वसई विरार शहरात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गतिरोधक उभारण्यात आले आहेत. मात्र, कायदेशीर आणि तांत्रिक नियमांचे पालन न करता रस्त्यावर बांधण्यात आलेले गतिरोधक वाहनचालकांसाठी अडथळा ठरू लागले आहेत. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, रहदारी सुरक्षित रहावी व अपघात टाळता यावेत यासाठी रस्त्यांवर गतिरोधक उभारले जातात. तसेच गतिरोधक उभारताना इंडियन रोड काँग्रेसने घालून दिलेले कायदेशीर व तांत्रिक नियम पाळणे आवश्यक आहे. या नियमांनुसार गतिरोधकाची उंची १० सेंटीमीटर (अंदाजे ४ इंच), रुंदी ३.७ मीटर आणि वाहनचालकांना पूर्वसूचना देणारा फलक किमान ४० मीटर आधी लावणे बंधनकारक आहे.

मात्र, अधिकृत परवानगी न घेता वसई विरार शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गतिरोधक उभारण्यात आले आहेत. तसेच यातले बहुतांश गतिरोधक हे वळणावर, जोडरस्त्यांवर व अरुंद रस्त्यांवर उभारण्यात आले असल्यामुळे वाहनचालकांना यामुळे अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. काही एकाच मार्गावर तीन ते चार गतिरोधक असल्यामुळे तर काही ठिकाणी अतिशय उंच गतिरोधक असल्यामुळे दुचाकी व तीनचाकी वाहने त्यावरून घेऊन जाणे कठीण होते. तसेच काहीवेळा तोलही जातो, अशी प्रतिक्रिया वसईतील रहिवासी प्रतीक नाईक यांनी दिली.

रस्त्यांवर मारण्यात आलेले मोठमोठे पॅच व खड्ड्यांचा त्रास कायम असताना बेकायदा गतिरोधकांमुळे वाहन चालकांच्या समस्येत अधिकच भर पडत आहे. त्यामुळे बेकायदा गतिरोधक तोडून रस्ते मोकळे करावेत व विनापरवानगी गतिरोधक उभारणाऱ्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे. तर शहरातील अनधिकृत गतिरोधकांची माहिती घेऊन ते हटवण्यात येतील, असे पालिकेच्या बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हुल्लडबाजांना रोखण्यासाठी गतिरोधक

ग्रामीण भागातील रस्त्यांवर तरुणांकडून केली जाणारी हुल्लडबाजी, वेगाने चालवली जाणारी वाहने तसेच अनेकदा घडलेले किरकोळ अपघात टाळण्यासाठी स्थानिकांकडून घराला लागून असणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक उभारले जातात, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

महापालिकेचे गतिरोधकही नियमबाह्य

महापालिकेकडून नुकतेच डांबरीकरण करून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. यावेळी खोदकामादरम्यान तुटलेले गतिरोधकही नव्याने बांधण्यात आले आहेत. मात्र, कंत्राटदारांनीही तांत्रिक नियमांकडे दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने अतिउंच गतिरोधक उभारल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.