वसई: वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी प्रस्तावित असलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या रिंगरूट, सागरी सेतू, रेल्वे उड्डाणपूल आणि मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी लोकप्रतिनिधी आणि एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत या प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच कामे सुरू होतील असे आश्वासन एमएमआरडीएने दिले आहे.
वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेने दैनंदिन दळणवळण करण्याची सुविधा अपुरी पडत असल्याने आता शहरातून प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाढती वाहनांची संख्या, अपुरे रस्ते, वाहनतळाचा अभाव, रस्त्यावरील फेरीवल्यांचे अतिक्रमण अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे नागरिकांना कोंडीत अडकून राहावे लागते. शहरातील नागरिकांचा प्रवास सुरक्षित व गतीशील व्हावा यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे.
यात रिंगरूट, पाच रेल्वे उड्डाणपूल, प्रमुख मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सागरी सेतू व शहरांतंर्गत विकास प्रकल्प एमएमआरडीए मार्फत राबविले जाणार आहे. या कामांना गती मिळावी यासाठी गुरुवारी मुंबईत एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी व लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात बैठकीत महापौर अजीव पाटील, आमदार राजन नाईक, महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी., माजी महापौर नारायण मानकर, सभागृह नेते प्रफुल्ल साने, विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि पालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरात प्रस्तावित असलेले प्रकल्पांची कामे प्रत्यक्षात सुरू करण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली.
यावेळी या प्रकल्पांची कामे विहीत वेळेत पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही नियोजन करीत आहोत असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे सर्व प्रकल्प राबवताना स्थानिक मच्छिमार, शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या रोजगारावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच निसर्गाची हानी होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल,” असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले आहे. सुमारे २० हजार कोटींच्या प्रकल्पामुळे शहराचा विकास अधिक सुसाह्य होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
असे आहेत प्रकल्प
३६ किमीचा रिंग रूट
शहरांतर्गत दळणवळण सुलभ करण्यासाठी ३६ किमी लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता (रिंग रूट) बांधला जाईल. हा रस्ता ४ मुख्य शहरे आणि २२ गावांना जोडणार आहे.
भाईंदर-नायगाव दुमजली पूल
खाडीवर उभारल्या जाणाऱ्या या पुलाच्या वरच्या थरावरून मेट्रो तर खालच्या थरावरून वाहने धावतील. यामुळे मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमधील अंतर काही मिनिटांवर येईल.
सागरी महामार्ग
वैतरणा खाडीवरील पूल आणि सागरी महामार्गामुळे पालघरचा पश्चिम भाग थेट जोडला जाईल, ज्यामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल.
नवीन रेल्वे उड्डाणपूल
विराट नगर, ओसवाल नगरी, अलकापुरी, उमेळमान येथे नवीन पूल आणि वसई रोड येथील जुन्या पुलाच्या जागी आधुनिक पूल उभारला जाणार आहे.
सिमेंट काँक्रिटीकरण
विरार फाटा ते अर्नाळा, नालासोपारा फाटा ते पश्चिम आणि वसई फाटा ते गावापर्यंत अशा ७ मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाईल.
भाजप बविआत श्रेयवाद
एमएमआरडीए माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या पायाभूत प्रकल्पांच्या पाठपुराव्यावरून भाजप आणि बविआ या दोन्ही राजकीय पक्षात श्रेयवाद सुरू झाला आहे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर व क्षितीज ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कामे मार्गी लागत असल्याचा दावा बविआकडून केला जात आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार राजन नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.
