वसई: वसई विरार शहराचे नागरीकरण जरी झपाट्याने होत असले तरी पाणी, आरोग्य, शिक्षण, परिवहन अशा मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने वसई विरार जनशक्ती आघाडीकडून वसईकरांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयात धरणे आंदोलन छेडले जाणार आहे.
वसई विरार शहरातील नागरीकरणासह लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, राज्य सरकार आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षित व्यवहारामुळे वसई-विरारमधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण, परिवहन आदी मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.
वाढत्या लोकसंख्येबरोबर परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत आहे. त्यामुळे प्रश्नांकडे प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वसई विरार जनशक्ती आघाडीकडून गुरुवार, १२ मार्च रोजी जनआक्रोश धरणे आंदोलन पुकारले जाणार आहे. सकाळी १० वाजता, तहसील कार्यालयाच्यासमोर हे आंदोलन छेडले जाणार आहे.
स्थानिक रहिवाशांची घरे नियमानुकूल करणे, वाढीव एफ.एस.आय. रद्द करणे, बेकायदेशीर घरपट्टी व शास्ती रद्द करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची नळ जोडणी देणे, विशेष व कार्यक्षम परिवहन सेवा उपलब्ध करून देणे, घनकचरा प्रकल्प सुरू करणे, निरी व आयआयटीच्या उपाययोजना लागू करणे, वसई विरारची बिघडलेली कायदा व सुव्यवस्था सुधारणे, वाढवण बंदर रद्द करणे, रस्ते, गटारे, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधा सुसज्ज करूनच नव्या इमारतींना परवानगी देणे, अशा विविध मागण्या या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असणार आहेत.
