वसई:– वसई-विरार शहर महापालिकेच्या जूचंद्र येथील माताबाल संगोपन केंद्रात अवघ्या ६२५ ग्रॅम वजनाने जन्मलेल्या अतिपूर्वजन्म बाळाला नवजीवन देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. जन्मानंतर अत्यंत नाजूक स्थितीत असलेल्या या बालकावर नवजात शिशू अतिदक्षता विभागात (NICU) सलग ८२ दिवस उपचार करण्यात आले. या उपचारांनंतर बालकाचे वजन १ किलो ६२५ ग्रॅमपर्यंत पोहोचले असून, महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी या बाळाचा जन्म झाला. जन्मावेळी केवळ ६२५ ग्रॅम वजन असल्याने बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अतिशय कमी वजनाने जन्मलेल्या बालकांना श्वसनाचा त्रास, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यातील अडचणी, संसर्गाचा धोका तसेच पोषण आणि शारीरिक वाढीशी संबंधित अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या बालकाला विशेष वैद्यकीय निगा आणि सातत्यपूर्ण देखरेखीची आवश्यकता होती.

रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायत्री गोरख आणि नवजात शिशू अतिदक्षता विभागातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अंजू तिवारी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी बालकाच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले. बालकाला आवश्यक वैद्यकीय उपचार, योग्य पोषण आणि विशेष निगा देण्यात आली. आरोग्य पथकाच्या समर्पित सेवेमुळे बालकाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली.

गेल्या ८२ दिवसांच्या उपचारांदरम्यान बालकाच्या वजनात एक किलोने वाढ झाली. जन्मावेळी ६२५ ग्रॅम असलेले वजन आता १ किलो ६२५ ग्रॅमपर्यंत पोहोचले आहे. बालकाने उपचारांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद, डॉक्टरांचे वैद्यकीय कौशल्य, परिचारिकांची अहोरात्र सेवा आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामुळे हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला. या संपूर्ण उपचारप्रवासात बालकाच्या पालकांनी दाखवलेला विश्वासही मोलाचा ठरला आहे. या यशस्वी उपचारप्रवासानंतर जूचंद्र रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य समिती सभापती निलेश देशमुख, आरोग्य समिती सदस्य डॉ. शुभांगी पाटील, आशिष वर्तक, अरुणा डाबरे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, यांनी उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी आरोग्य पथकाच्या कार्याची प्रशंसा करून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले.

गरिबांसाठी महापालिकेची रुग्णालये ठरताहेत वरदान

अत्यंत नाजूक स्थितीत जन्मलेल्या चिमुकल्याला नवजीवन मिळवून देणे, ही आपल्या संपूर्ण वैद्यकीय पथकासह वसई-विरारसाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आहे. आजच्या काळात हेच बाळ एखाद्या खाजगी रुग्णालयात असते, तर उपचारापोटी पालकांना लाखांचा खर्च करावा लागला असता; जो एका सामान्य कुटुंबाच्या आटोक्याबाहेरचा होता. मात्र, महापालिका रुग्णालयात ही वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत मिळाल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेची रुग्णालये खऱ्या अर्थाने गरिबांसाठी वरदान ठरत आहेत. अशी प्रतिक्रिया आरोग्य सभापती निलेश देशमुख यांनी दिली. महापालिका रुग्णालयांमध्ये दरवर्षी सरासरी १० हजार सुरक्षित प्रसूती होतात. अनुभवी डॉक्टर आणि समर्पित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अखंड सेवेमुळेच हे यश शक्य होत आहे असेही देशमुख यांनी सांगितले आहे.