वसई: वसई-विरार शहरात पाण्याचे नैसर्गिक जलस्रोत असलेली बावखले आणि तलाव मातीचा भराव टाकून बुजवले जात असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि अमूल्य जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी अखेर महापालिका आणि महसूल विभागाने संयुक्त ‘विशेष कृती दल’ नियुक्त केले आहे. ज्या ठिकाणी अशा तक्रारी येतील, तिथे तात्काळ कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

​वसई-विरारच्या विविध भागांत अनेक वर्षांपूर्वी शेतीला पाणी पुरवण्यासाठी आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी ‘बावखले’ (पारंपरिक पाण्याचे साठे) तयार करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ही बावखळे वसई पश्चिम परिसरातील पाण्याची गरज भागवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, सध्या जमिनीचे दर गगनाला भिडल्याने काही ठिकाणी ही बावखले बुजवून त्यावर बांधकामे करण्यास सुरुवात केली आहे. या जलस्रोतांमध्ये राडारोडा आणि कचरा टाकून ते नष्ट केले जात असल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

​नुकताच वसई पश्चिम येथील मर्सेस भागात बावखळ बुजविण्याचा प्रकार उघडकीस आला होता. हे नैसर्गिक जलस्रोत नष्ट झाल्यास भविष्यात वसईवर मोठे जलसंकट ओढवेल, अशी भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.​या समस्येवर पर्यावरणप्रेमींनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन बावखल संवर्धनासाठी ठोस धोरण निश्चित करण्याची मागणी केली होती. तसेच, वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी देखील या गंभीर प्रश्नावर आवाज उठवला होता. अखेर महापालिका व महसूल विभागाने संयुक्त पुढाकार घेत जलस्त्रोतांचे संवर्धनासाठी विशेष पथक नियुक्त करून कारवाई करण्याचा निर्धार केला आहे.

फिरते पथक तैनात

महापालिकेकडून राडारोडा नियंत्रणासाठी फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्याच पथकाच्या मदतीने शहरातील जलस्त्रोतामध्ये राडारोडा व माती भराव केल्याचे आढळल्यास महापालिकेच्या पथकामार्फत महसूल विभागास कळविण्यात येते त्यानंतर संयुक्त पाहणी करून पुढील कारवाई केली जाईल असे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.

कारवाईच्या खर्चाचा बोजा सातबाऱ्यावर

नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन झालेच पाहिजे यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. जो कोणी बावखल किंवा तलाव बुजवतील त्यांना सुरुवातीला तो काढण्याची सूचना दिली जाईल. त्यानंतर जर हटविले नाही तर महापालिकेच्या पथकाच्या मदतीने हटवून जलस्त्रोत पूर्ववत केला जाईल व त्यासाठी जो काही खर्च येईल तो संबंधित मालकांच्या सातबाऱ्यावर बोजा म्हणून चढविला जाईल असे निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांनी सांगितले आहे.