वसई: वसई-विरार महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून सुशोभित केलेल्या तलावांच्या देखभाल-दुरुस्तीकडे आणि सुरक्षेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील अनेक तलावांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असल्याने, लहान मुले आणि नागरिक पोहण्यासाठी तसेच मासेमारीसाठी जीव धोक्यात घालून तलावात उतरत आहेत. यामुळे तलावात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांचे सत्र सुरूच असून, नुकताच नालासोपाऱ्यात एका १७ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वसई-विरार शहरात शंभराहून अधिक नैसर्गिक तलाव आहेत. या तलावांचे संवर्धन व्हावे आणि नागरिकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी पालिकेने टप्प्याटप्प्याने कोट्यवधी रुपये खर्चून तलावांचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण केले होते. सकाळी व संध्याकाळी नागरिक येथे फेरफटका मारण्यासाठी, तर लहान मुले खेळण्यासाठी येतात. मात्र, सुशोभीकरणानंतर पालिका प्रशासनाला या तलावांच्या देखभालीचा विसर पडला आहे.सध्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच तलाव तुडूंब भरले आहेत. अशा स्थितीत अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विरार तलाव, गोखीवरे, आचोळे, पापडी, नागेला (नालासोपारा) आणि गालानगर
तलाव या ठिकाणी लावण्यात आलेल्या सुरक्षाजाळ्या अनेक महिन्यांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. इतकेच नव्हे तर, आचोळे तलावाच्या किनाऱ्याचा काही भाग मागील वर्षभरापासून खचला आहे. याकडे पालिकेने पूर्णपणे डोळेझाक केली असून, खेळताना लहान मुले तलावात पडण्याची किंवा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच तलावांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
२ ऑगस्ट रोजी नालासोपारा येथील नागेला तलावात मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी गेलेला सोहेल शेख (१७) हा तरुण तुटलेल्या जाळीतून तलावात उतरला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, सुरक्षेच्या अभावामुळेच अशा निष्पाप जिवांचा बळी जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये विरार पश्चिमेच्या बोळींज खारोडी येथील तलावात १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला होता.
पोलिसांच्या सूचना आणि बंदीकडे नागरिकांचेही दुर्लक्ष
पावसाळ्यात तलाव, नद्या आणि समुद्रकिनारी बुडून होणारे अपघात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून काही धोकादायक ठिकाणी बंदी घालण्यात आली असून, सूचना फलक देखील लावण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाच्या सुरक्षेतील त्रुटींसोबतच अनेकदा नागरिक व तरुण वर्गही या सूचनांचे उल्लंघन करताना दिसतात.
सर्वेक्षण करून उपाययोजना करणार
तलावांच्या ठिकाणी बुडून होणारे मृत्यू ही अतिशय गंभीर बाब आहे. नागरिक व लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधकाम विभाग आणि उद्यान विभागाला तातडीने निर्देश दिले जात आहेत. ज्या ठिकाणी जाळ्या तुटल्या आहेत किंवा नाहीत, अशा ठिकाणांचे तात्काळ सर्वेक्षण करून तिथे आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.”- संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका
