वसई: पावसाळा तोंडावर आलेला असताना वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील डोंगराळ आणि टेकड्यांच्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या विविध प्रभाग समित्यांच्या अंतर्गत येणाऱ्या तब्बल ३३ अतिसंवेदनशील आणि दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यात सर्वाधिक धोका प्रभाग समिती ‘एफ’ (धानिव-पेल्हार) आणि प्रभाग समिती ‘जी’ (वालीव) या भागात असल्याचे समोर आले आहे.

वसई विरार शहरातील बहुतांश भाग हा डोंगर परिसराचा आहे. या डोंगराच्या पायथ्याशी व डोंगरावर ही नागरिकांच्या वस्त्या आहेत. तर काही ठिकाणी डोंगर पोखरून अगदी डोंगराच्या जवळपास भूमाफियांनी चाळी उभारल्या आहेत. अशा ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने नागरी वस्ती आहे.

काही वेळा पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे डोंगर भागातील माती पोकळ होऊन भूस्खलन होणे, दरड कोसळणे अशा घटना घडत असतात. अनेकदा दरड कोसळून जीवितहानी व वित्तहानी होत असते. पावसाळ्यात अशा घटना घडू नये यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. महापालिकेने शहरातील डोंगर माथ्याचे परिसर, व डोंगराला लागून असलेल्या भागांचे सर्वेक्षण केले आहे. यात शहरात ३३ ठिकाणे ही धोकादायक असून अशा ठिकाणी भूस्खलन व दरड कोसळण्याची शक्यता आहे. म्हणून महापालिकेने अशा ठिकाणांना भूस्खलन व दरड प्रवण क्षेत्र घोषित केले आहे. त्याची यादी सुद्धा महापालिकेने प्रसिद्ध केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी दिली आहे.

विशेष उपाययोजना करण्यावर भर

महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी महिना भरापूर्वी शहराचा दौरा केला होता. त्यावेळी दरड प्रवण क्षेत्र, धोकादायक इमारती याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या. याच अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी

दरड प्रवण क्षेत्र ठिकाणांवर पालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असून त्या ठिकाणी जनजागृती करणे, त्याभागात राहणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय सूचना फलक लावणे, याशिवाय आवश्यक ठिकाणी जाळ्या लावणे अशी कामे ही मार्गी लावली जात असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

अशी आहेत दरडप्रवण क्षेत्र

​प्रभाग समिती बी (विरार पूर्व)मोरेंगाव डोंगरी आणि नालासोपारा (पूर्व) मधील कारगील नगर, टेपाचा पाडा.

​प्रभाग समिती सी चंदनसार – जिवदानी पाडा, अन्ना पाडा, राक्षसी पाडा, साईनाथ झोपडपट्टी, वैष्णवी जिवदानी विरार (पूर्व), आणि जोत्स्ना अपार्टमेंट-साईनाथ नगर.

​प्रभाग समिती डी आचोळे – आचोळे डोंगरी (पडखळ पाडा) आणि तुळजा सेवालाल नगर.

​प्रभाग समिती ई नालासोपारा- निळेगाव डोंगरी, नालासोपारा (पश्चिम).

​प्रभाग समिती एफ (धानिव-पेल्हार) – संतोष भवन, शिर्डीनगर, काजूपाडा, वालईपाडा, पाच आंबा, आझाद नगर, विष्णू नगर, शांतीनगर (नवाजीवन), गडगापाडा, धानिव, शिरसाड आणि इंदिरा नगर वसाहत.प्रभाग समिती जी वालीव – बिलालपाडा, अलंगपाडा, सातीवली खडी, गोखिवरे भागपाडा, भोयदापाडा, गोखिवरे बंजार पाडा, सातीवली डोंगरी, राजावली, वाघरालपाडा आणि जानकीपाडा.

दरडप्रवण क्षेत्राचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करून ती प्रसिद्ध केली आहे. याशिवाय दरड प्रवण क्षेत्रात सूचना फलक, जाळ्या लावणे व त्यांचे स्थलांतर करण्याच्या संदर्भात उपाययोजना करण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले. – दीपक सावंत. अतिरिक्त आयुक्त महापालिका