वसई: मुंबई जवळील दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान लोकल मधून पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा लोकल मधून जीवघेणा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसई विरार करांनाही दररोज विरार ते चर्चगेट असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मागील दीड वर्षात रेल्वे अपघातात वैतरणा ते मिरारोड या दरम्यान २८४ जणांचा बळी गेला असून यात ६१ जणांचा लोकल मधून पडून मृत्यू झाला आहे.

मिरारोड ते वैतरणा अशी ३१ किलोमीटरची रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द आहे. यात सात स्थानकांच्या समावेश आहे. मागील काही वर्षपासून या सर्व स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. विशेषतः विरार, नालासोपारा, वसई, नायगाव या स्थानकातून मुंबईच्या दिशेने ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे १२ ते १५ लाख इतकी आहे. यातील सर्वाधिक प्रवासी नालासोपारा रेल्वे स्थानकातून प्रवास करतात.

विरार ते चर्चगेट अशा दिवसाला साध्या लोकलच्या २२४ फेऱ्या ये -जा होतात. वातानुकूलित लोकलच्या ५७ फेऱ्या आहेत.मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी ही आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागली आहे. लोकल मध्ये उभे राहण्यास ही जागा नसल्याने अनेक प्रवासी ही लोकल दरवाज्यात लटकून प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

२०२४ ते जून २०२५ या दीड वर्षात मिरारोड ते वैतरणा स्थानका दरम्यान २८४ मृत्यू झाला आहे. यात १७१ मृत्यू हे लोकलच्या धडकेत तर ६१ जणांचा लोकल मधून तोल जाऊन पडून मृत्यू झाला आहे. तर ५२ जणांचा मृत्यू इतर कारणामुळे झाला असल्याची माहिती रेल्वे पोलीसांनी दिली आहे.

रेल्वेतून पडून १८० जखमी

रेल्वे प्रवासादरम्यान जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. मागील दीड वर्षात मिरा रोड ते वैतरणा या दरम्यान २८६ प्रवासी रेल्वे अपघातात जखमी झाले आहेत. यातील सर्वाधिक म्हणजेच १८० रेल्वे प्रवासी धावत्या लोकल मधून पडून जखमी झाले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. वाढत्या गर्दीमुळे लोकल मध्ये लटकून प्रवास होतो त्यामुळे अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडू लागल्या आहेत.

सर्वेक्षण करताना प्रवाशांना विचारात घ्या

रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर नियोजन करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. मात्र ते करत असताना सर्वसामान्य प्रवाशांना विचारात घेतले जात नसल्याची तक्रार आता प्रवासी करू लागले आहेत. सध्या स्थितीत वसई विरार भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बेसुमार आहे. त्याचे वेळापत्रक व त्यातील करण्यात येणारे बदल हे महिनाभर आधीच विचारून तयार केले पाहिजे असे महिला रेल्वे प्रवासी मृदुला खेडेकर यांनी सांगितले आहे. याशिवाय गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने ज्या काही आवश्यक उपाययोजना आहेत त्या केवळ रेल्वेने करून चालणार नाही तर राज्य सरकार व अन्य संबंधित शहरातील यंत्रणांनी करणे आवश्यक असल्याचेही खेडेकर यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दीड वर्षांतील आकडेवारी
( वर्ष २०२४ – ९ जून २०२५पर्यंत )

एकूण मृत्यू एकूण जखमी
२८४ २८८
ठोकर लागून १७१ ३६
पडून ६१ १८०
इतर ५२ ७२