वसई: मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रकवर पाणी साचल्यामुळे काल वसईपर्यंतच लोकल सेवा सुरू होत्या. त्यामुळे नालासोपारा आणि विरार येथे राहणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या सुमारास मोबाईलच्या उजेडात रेल्वे रुळांवरून धोकादायक प्रवास करत घर गाठावे लागले.
वसई विरार शहरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील सखल भाग, मुख्य वाहतुकीचे रस्ते, बाजारपेठा, बैठ्या चाळी, गृहसंकुलांचे काही भाग पाण्याखाली गेले आहेत. कमरेपर्यंत साचलेल्या पाण्यात दुचाकी, चारचाकी, रिक्षा आणि महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस बंद पडत असल्यामुळे शहरातील परिवहन व्यवस्थाही ठप्प झाली आहे.
एकीकडे शहरांतर्गत मुसळधार पावसाचे पडसाद उमटत असतात. मुंबई आणि उपनगरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलवर देखील या पावसाचा परिणाम झाला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे काल विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरारदरम्यान धीम्या गतीने सुरू असणारी वाहतूक काल काही अंशी ठप्प झाली.
विरार ते नालासोपाऱ्यादरम्यान रेल्वे रुळावरील पाणी वाढत गेल्याने पश्चिम रेल्वेकडून या दोन्ही स्थानकांदरम्यांची वाहतूक बंद करण्यात आली. चर्चगेट ते वसई आणि वसई ते चर्चगेट अशी लोकल सेवा सीमित करण्यात आल्याने विरार आणि नालासोपाऱ्यातील असंख्य रहिवाशांना रेल्वे रुळांवरून पायी चालत भर अंधारात तास दोन तासांचा प्रवास करून घर गाठावे लागले. सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ व्हायरल होत असून नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर टीका केली जात आहे.
दुसऱ्या दिवशीही लोकलसाठी गर्दी
विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात अद्यापही सुरळीत लोकल सेवा सुरु झालेली नाही. त्यामुळे आजही दोन्ही रेल्वे स्थानकात प्रवाशांची अलोट गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
