वसई: वसई विरार शहरात वाढत्या नागरिकरणामुळे विजेची मागणी वाढू लागली आहे. या वाढत्या वीज ग्राहकांमुळे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रावर अतिभार वाढू लागला आहे. त्यामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होण्याचे प्रकार समोर येत असतात. अशा घटना टाळण्यासाठी व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने आणखीन नवीन पाच २२/ २२ केव्ही क्षमतेची उपकेंद्र प्रस्तावित केली आहेत.

वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढू लागले आहे. याशिवाय या भागात औद्योगिक क्षेत्राचा विस्तार ही वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत ही वाढ होऊ लागली आहे. वसई विरार विभागातील वीज ग्राहकांची संख्या सद्यस्थितीत १० लाख ६२ हजार इतके वीज ग्राहक आहेत. यात घरगुती , वाणिज्य आणि औद्योगिक, कृषी , पथदिवे, पाणी पुरवठा या ग्राहकांचा समावेश आहे. वसईच्या विभागाला साधारणपणे वर्षाला तीन ते साडेतीन हजाराहून अधिक मिलियन युनिट्स इतका वीजपुरवठा केला जात आहे. परंतु वर्षागणिक सरासरी १० ते १२ टक्क्यांनी वीज ग्राहक वाढत आहेत. या वाढत्या वीज ग्राहकांमुळे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रावर अतिभार वाढत आहे. या वाढत्या अतिभारामुळे काही वेळा वीज वितरणात तांत्रिक अडचणी निर्माण होतात आणि वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.

सद्यस्थितीत महावितरणची शहरात २९ उपकेंद्र आहेत. त्यातून वीज ग्राहकांना वीज पुरवठा होतो. त्या केंद्रात वाढ करण्याचा निर्णय महावितरण ने घेतला आहे. आणखीन शहरात विविध ठिकाणच्या भागात पाच नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही उपकेंद्र २२/२२ केव्हीची केंद्र प्रस्तावित केली आहेत.यात विरार पश्चिम एचडीआयएल, विरार पूर्वेच्या कण्हेर, मनवेलपाडा, वसई फाटा आणि पेल्हार अशा ठिकाणांचा समावेश आहे. या नवीन उपकेंद्राच्या बाबत प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर दिला असून त्याला अंतिम मंजुरी मिळताच कामे सुरू होतील असे महावितरणचे अधीक्षक अभियंता माणिक राठोड यांनी सांगितले आहे.

अतिभारित रोहित्रावर लक्ष

वसई विरार शहरात वीज पुरवठा करण्यासाठी ६ हजार २२ इतकी रोहित्र (ट्रान्सफार्मर) बसविली आहेत. मात्र काही भागात रोहित्रावर वीज ग्राहकांचा अतिभार आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होत असतो. याचा मोठा मनस्ताप हा वीज ग्राहकांना सहन करावा लागतो. याशिवाय यंदाच्या उन्हाळ्यात वाढलेल्या वीज वापरामुळे अनेक ठिकाणी रोहित्रात तांत्रिक बिघाड व फुटण्याच्या घटना समोर आल्या होत्या. तर नुकताच झालेल्या पूरस्थितीत ६२ रोहित्र बंद झाली होती. त्यानंतर शहरात महावितरणने शहरात नवीन ८० रोहित्र उपलब्ध करून निम्म्याहून अधिक रोहित्र बदलण्यात आली आहेत.