वसई : जुलै महिन्यात वसई-विरार शहरात ओढवलेल्या भीषण पूरपरिस्थितीमुळे महावितरणच्या यंत्रणेचे दाणादाण उडाली होती. सखल भागात पुराचे पाणी साचल्याने शहराचा मोठा भाग कित्येक दिवस अंधारात गेला होता. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय टळावी, यासाठी महावितरणच्या वसई मंडळाने ११२.६० कोटी रुपयांचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला असून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आह
वसई-विरार शहरात महावितरणचे सुमारे ११ लाख १५ हजार घरगुती, व्यावसायिक, कृषी व औद्योगिक ग्राहक आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे ९१ वीज खांब कोसळले, तर ६२ ट्रान्सफॉर्मर व वीजवाहिन्यांचे प्रचंड नुकसान झाले. याहून गंभीर बाब म्हणजे सनसिटी, नालासोपारा पश्चिम, ग्लोबल सिटी, पापडी आणि विरार पश्चिम येथील २२ केव्ही क्षमता असलेली मुख्य उपकेंद्रे (सबस्टेशन्स) पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. तसेच अनेक गृहसंकुलांच्या तळमजल्यावरील फिडर पिलर आणि वीजपेट्या पाण्यात बुडाल्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी महावितरणला सलग ३ ते ४ दिवस वीज पुरवठा बंद ठेवावा लागला होता. वीज नसल्याने इंटरनेट आणि मोबाईल सेवाही ठप्प झाली होती. त्यामुळे येथील नागरिकांचा बाह्य जगाशी संपर्क तुटला होता.
भविष्यात पूरपरिस्थितीतही वीज सेवा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने नियोजन आखले असून महावितरणच्या विभागीय अधिकारी व कर्मचारी यांनी सखल भागांचे सर्वेक्षण केले होते. जे जे भाग पूरस्थिती दरम्यान पाण्याखाली जातात अशा ठिकाणी काय काय उपाययोजना करता येतील असा सुमारे ११२.६० कोटींचा सर्वसमावेशक आराखडा तयार करुन तो शासन स्तरावर मंजुरीसाठी ठेवला आहे अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
विशेषतः शहरात ज्या भागात पाण्याचा निचरा वेगाने होत नाही, अशा ठिकाणचे सर्व फिडर पिलर सुरक्षित उंचीवर नेले जातील. तसेच पाण्याखाली गेलेल्या सर्व उपकेंद्रांचे तांत्रिक पुनर्नियोजन करून, भविष्यात अतिवृष्टीतही सबस्टेशनमध्ये पाणी शिरणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे असेही महावितरण कडून सांगण्यात येत आहे.
आराखड्यातील प्रमुख कामे कोणती
यंत्रणेची उंची वाढवणे –
सखल भागात वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणच्या ४ महत्त्वाच्या स्विचिंग केंद्रांची आणि ११४ डीटीसी प्लिंथची उंची वाढवली जाणार आहे.
उपकरणांचे नूतनीकरण व सक्षमीकरण
२२ केव्ही उपकेंद्रांच्या आतील भागात ६ नवीन आरएमयू (RMU) बसवले जातील. तसेच पुराचा फटका बसणारे १५७ (६-वे), १०३० (४-वे) आणि २०७० इतर मिनी पिलर अशा एकूण ३,२६६ फिडर मिनी पिलरचे पुनर्रचना व रिप्लेसमेंट केले जाईल.
नवीन केबल आणि लाईन अंथरणे
पुराच्या पाण्यापासून संरक्षण मिळण्यासाठी २८१ किलोमीटर लांबीची एलटी केबल, १.२० किमी आणि ४ किमीच्या नवीन २२ केव्ही वीजवाहिन्या अंथरल्या जाणार आहेत.
सुरक्षा व अर्थिंग
सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी २,२२८ ठिकाणी री-अर्थिंग, २२ केव्हीचे २ आयसोलेटर आणि ६० नवीन डीपी संरचना उभारल्या जातील.
गृहसंकुलाच्या तळमजल्यावर असलेले मीटर बॉक्स ही वरील भागात शिफ्ट करण्याच्या सूचना केल्या आहेत.
शहरातील वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरण कडून विविध उपाययोजना आखल्या जातात. विशेषतः पूरस्थिती काळात ज्या समस्या निर्माण होतात. त्याचा सविस्तर आढावा घेऊन आराखडा तयार करून प्रशासनाकडे मंजुरीला पाठविला आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होताच ही कामे मार्गी लागतील. – माणिक राठोड, अधीक्षक अभियंता महावितरण वसई.
