वसई: नालासोपारा आचोळे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महापालिकेच्या बहुप्रतिक्षित नाट्यगृहाच्या नामकरणावरून वाद पेटला आहे. या नाट्यगृहाला ‘मजेठिया नाट्यगृह’ असे संबोधण्यावर ‘मराठी एकीकरण समिती’ने तीव्र आक्षेप घेतला आहे. हे नाव मराठी अस्मितेला छेद देणारे असून, या नाट्यगृहाला स्थानिक रंगभूमीचे ज्येष्ठ कलावंत स्व. मास्टर दत्ताराम वळवईकर यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणी समितीने केली आहे.

​नाट्यगृहाच्या विलंबाबाबत बोलताना मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “प्रभू श्रीरामालाही १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला होता, तशीच काहीशी अवस्था वसई-विरारमधील नाट्यप्रेमींची झाली आहे. तब्बल १४ वर्षे वाट पाहिल्यानंतर हे नाट्यगृह उभे राहिले; मात्र आता त्याला ‘मजेठिया’ असे नाव देण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते मराठी एकीकरण समिती आणि येथील भूमिपुत्र कदापि सहन करणार नाहीत असे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले. गरज पडल्यास या विरोधात महापालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही यावेळी
त्यांनी दिला.
​
​या संदर्भात आम्ही वसई-विरार महापालिका आयुक्त, महापौर आणि विरोधी पक्षनेते यांची भेट घेऊन आमची भूमिका मांडली आहे. शहरातील चौकांना, रस्त्यांना आणि सार्वजनिक वास्तूंना मराठी व्यक्तींची तसेच स्थानिक भूमीपुत्रांचीच नावे मिळाली पाहिजेत. वाढत्या शहरीकरणात शहराची मराठी अस्मिता टिकवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे काळाची गरज आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

​समितीच्या प्रमुख मागण्या

  • नालासोपारा आचोळे नाट्यगृहाला स्थानिक ज्येष्ठ कलावंत स्व. मास्टर दत्ताराम वळवईकर यांचे नाव देणे.
  • ​शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणे.
  • ​वसई-विरार महापालिका क्षेत्रात एक सुसज्ज व भव्य ‘मराठी भाषा भवन’ स्थापन करणे.
  • क्रीडा संकुलाला महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू किंवा महापुरुषांचे नाव देणे; तसेच विविध रस्ते व चौकांना स्थानिक सैनिक, साहित्यिक, लेखक, कवी आणि महापुरुषांची नावे देणे.
  • ​शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांवर मराठी पाट्यांची सक्ती करणे आणि अनधिकृत जाहिरात फलकांवर कडक कारवाई करून ते हटवणे.