वसई: वसई विरारच्या खाडी किनाऱ्यावर, पाणथळ जागेत मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. मात्र काही ठिकाणी त्यांची कत्तल, त्यावर अतिक्रमण करून ती नष्ट करण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा कांदळवन क्षेत्राचे संवर्धन व्हावे यासाठी विरार मारंबळपाडा आणि वसई नायगाव येथे ‘मॅंग्रोव्ह पार्क’ उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी स्थळ पाहणी, नियोजित आराखडा तयार करणे अशी कामे ही प्रगतीपथावर आहे. या पार्कमुळे शहराच्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वसई विरारमध्ये खाडी किनारे, पाणथळ जागा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे. हे कांदळवन क्षेत्र हे महसूल विभागाच्या अखत्यारीत येत आहे. कांदळवने ही पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. याशिवाय याच कांदळवन क्षेत्र व पाणथळ जागेच्या क्षेत्रात कांदळवनांमध्ये विविध प्रकारचे पशु पक्षी ही आश्रयाला येत आहेत. मात्र शहराच्या वाढत्या नागरिकाकरणामुळे कांदळवनांची कत्तल करण्याचे काम सुरू आहे. कत्तल करून अनधिकृत बांधकामे उभारणे, माती भराव टाकून वने नष्ट करणे, वाळू उपसा करणे अशा कारणामुळे कांदळवनांचा ऱ्हास होऊ लागला आहे.

आता अस्तित्वात असलेले कांदळवन क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी व पर्यावरणीय दृष्टीने त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार करण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबवून कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नुकतीच मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांची आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे- पंडित, वनविभाग कांदळवन कक्षाचे अधिकारी यांच्यात बैठक पार पडली होती.या बैठकीत कांदळवनांच्या विविध प्रजातींचे संवर्धन व्हावे, त्याची माहिती नागरिकांनाही मिळावी, याशिवाय पर्यटनाच्या दृष्टीनेही वसई-विरार शहराचा विकास व्हावा यासाठी वसई आणि विरार अशा दोन्ही ठिकाणच्या भागात ‘मॅंग्रोव्ह पार्क’ उभारण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

याच अनुषंगाने रविवारी स्थानिक लोकप्रतिनिधी व कांदळवन कक्षाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी यांनी विरारच्या मारंबळपाडा व नायगाव अशा दोन्ही ठिकाणच्या कांदळवन क्षेत्राची पाहणी केली. यावेळी तेथील कांदळवनांची सद्यस्थितीत जाणून घेतली. विरारनजीकच्या मारंबळपाडा येथील नवीन जेट्टी व जुनी जेट्टी दरम्यान मँग्रोव्ह पार्क उभारले जाणार आहे. तसेच समुद्र जीव अभ्यासासाठी ओपन डेक उभारण्यात येणार असल्याचे आमदार राजन नाईक यांनी यावेळी सांगितले.

निसर्ग संवर्धनासोबतच पर्यटनाला चालना देण्यासाठी नायगाव पश्चिमेच्या पाणजू बेटाजवळ ‘मँग्रोव्ह पार्क’ उभारण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली असल्याचे आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी सांगितले आहे.

‘मॅंग्रोव्ह पार्क’ तयार करण्यासाठी नियोजित आराखडा तयार करण्यासाठी स्थळ पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.
-प्रतीक मोडवान, वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग

कांदळवन पर्यटन व रोजगार

कांदळवन संवर्धन व या कांदळवनाच्या क्षेत्रात वन पर्यटन क्षेत्र कसे तयार होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच कांदळवनाच्या भागात विविध प्रकारे उपजीविका करणारे विविध प्रजातीचे पशु पक्षी ही आश्रयाला येत असतात त्यामुळे ते पाहण्यासाठी पक्षी अभ्यासक, विविध ठिकाणचे निसर्गप्रेमी पर्यटक ही याठिकाणी भेट देण्यास येऊ शकतात. तसेच यासोबतच येथील स्थानिक नागरिक आहेत त्यांना ही रोजगाराची मोठी संधी यातून उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिताडा पालन, खेकडे पालन,कालवे पालन, सुशोभित मासे पालन, असे विविध व्यवसाय करता येणार आहेत. यातून रोजगार ही मिळू शकणार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने शहराच्या विकासाला ही चालना मिळणार आहे.