वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत भुयारी गटारे, मलजल टाक्या आणि सांडपाणी प्रकल्पांची स्वच्छता मानवी पद्धतीने करण्यावर कायदेशीर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. असे असतानाही महापालिकेच्या ठेकेदारांकडून सर्व नियम धाब्यावर बसवून सफाई कर्मचाऱ्यांना थेट मॅनहोलमध्ये (भूमिगत गटारात) उतरवून काम करून घेतले जात असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. प्रशासनाच्या या बेफिकीर कारभारावर आणि ठेकेदारांच्या मनमानीवर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राज्य शासनाच्या ‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ या उपक्रमांतर्गत मानवी पद्धतीने मैला साफ करणे आणि मलजल वाहिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना उतरवण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. यापुढे शौचालयातील टाक्या व भुयारी गटारांची स्वच्छता केवळ आधुनिक यांत्रिक पद्धतीनेच केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला होता. तसेच नियमबाह्य पद्धतीने काम करून घेणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. अशा कामांसाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि आवश्यक सुरक्षा साधनसामग्री वापरणे बंधनकारक आहे.
मात्र, वसई-विरारमध्ये या सर्व नियमांना पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र आहे. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून सुरक्षेची कोणतीही साधने न देता कर्मचाऱ्यांना उघड्या अंगाने गटारात उतरवले जात आहे. नुकताच नालासोपारा पूर्वेकडील नगिनदास पाडा भागात कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय एका कर्मचाऱ्याला थेट मॅनहोलमध्ये उतरवून गटाराची सफाई करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील अन्य ठिकाणच्या भागात ही असेच प्रकार घडत आहे. अशा प्रकारे सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
भुयारी गटारे आणि सांडपाण्याच्या टाक्यांमध्ये प्राणघातक विषारी वायू तयार होत असतात. सुरक्षेची कोणतीही साधने नसताना अशा वातावरणात उतरल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम तर होतोच, शिवाय विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू होण्याचा मोठा धोका असतो. पालिकेचे नियम कागदावरच राहिले असून ठेकेदारांच्या या जीवाशी खेळणाऱ्या पद्धतीवर पालिका प्रशासन कधी कारवाई करणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मॅनहोल मध्ये सफाई कर्मचारी उतरवून स्वच्छता केली जात असल्याची तक्रार समोर आली आहे. त्यानंतर तातडीने आर अँड बी इन्फ्रा या कंपनीच्या ठेकेदाला नोटीस पाठविली आहे. :- जितेंद्र नाईक, सहायक आयुक्त महापालिका (घनकचरा विभाग)
महापालिकेच्या अत्याधुनिक यंत्रणा आहेत कुठे ?
वसई-विरार शहर महानगरपालिकेने शहरातील गटारांची योग्य व प्रभावीपणे स्वच्छता करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तीन वर्षांपूर्वी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुमारे ३ कोटी ४० लाख रुपये खर्च करून सात नवीन सक्शन-कम-जेटिंग वाहने खरेदी केली आहेत.
यामध्ये १० हजार लिटर क्षमता असलेली चार आणि ३ हजार लिटर क्षमता असलेली तीन वाहने समाविष्ट आहेत. याशिवाय, मानवी हस्तक्षेपाशिवाय गटारे आणि मॅनहोल्सची स्वच्छता व्हावी यासाठी पालिकेने १ कोटी २० लाख रुपये खर्चून तीन अत्याधुनिक ‘बँडीकूट’ रोबोटिक यंत्रेही ताफ्यात दाखल केली आहेत. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेली ही अत्याधुनिक यंत्रणा प्रत्यक्षात कुठे आणि कशा प्रकारे वापरली जात आहे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
