वसई: वसई विरार महापालिका निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजेच महापौर आणि उपमहापौर पदाकडे. शुक्रवारी बहुजन विकास आघाडी आणि भाजप अशा दोन्ही पक्षाकडून महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

वसई विरार महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली. या महापालिका निवडणुकीत ११५ पैकी बहुजन विकास आघाडीने ७०,.भाजपने ४३, काँग्रेस १, व शिवसेना (शिंदे गट) १ असे नगरसेवक निवडून आले आहे. निवडणुक निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती.

या दिवशी बहुजन विकास आघाडीकडून महापौर पदासाठी अजीव पाटील आणि प्रफुल्ल साने यांनी तर भाजपाकडून महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . तर उपमहापौर पदासाठी बविआकडून मार्शल लोपीस, कन्हैया भोईर, तर भाजपाकडून नारायण मांजरेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने महापौर निवडीची चुरस अधिकच वाढली आहे.

संख्याबळाच्या तुलनेत बविआ आघाडीवर

नुकताच पार पडलेल्या निवडणूकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत ७० जागा जिंकल्या आहे तर काँग्रेसची १ अशा एकूण ७१ नगरसेवक हे बविआकडे आहेत. तर भाजपकडे ४४ नगरसेवक आहेत त्यामुळे सद्यस्थितीत संख्याबळाच्या तुलनेत बविआ आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बविआकडून गुपित कायम

बविआने निवडणूकीत एकहाती सत्ता मिळविली असल्याने महापौर व उपमहापौर पदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक होते. महापौर साठी ७ तर उपमहापौर साठी १० जणांनी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज दाखल केले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत महापौर पदासाठी दोन तर उपमहापौर पदासाठी दोन अशा चार उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करून अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले आहेत, असे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले. त्यामुळे अंतिम क्षणी या दोन्ही पदांवर कोणाची वर्णी लागणार, हे गुपित बविआने कायम ठेवले आहे.