वसई : वसई विरार महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवड ३ फेब्रुवारीला होणार आहे. या पदनिवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरिता अर्ज नगरसचिव कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. वसई विरार महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या चुरशीच्या निवडणूकीत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी ७० जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा पालिकेत सत्ता स्थापन केली आहे. तर भाजपनेही ४३ जागा जिंकल्या असून काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
निवडणूका झाल्यानंतर नुकतीच मुंबई मंत्रालयात महापौर पदासाठी २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली. यात वसई विरार महापालिकेचे महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या आरक्षण प्रक्रियेनंतर महापौर व उपमहापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची वसई विरार शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महापौर व उपमहापौर पदाच्या निवड ही ३ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी निवडीच्या विशेष सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज आज, ३० जानेवारीला स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे महापौर व उपमहापौर पदासाठी निवडून आलेले कोणते उमेदवार अर्ज दाखल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया
३० जानेवारी २०२६ ला सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतेपर्यंत अर्ज स्वीकारणार, त्यानंतर याच दिवशी ३.३० वाजता या दोन्ही पदांसाठी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून त्याच वेळी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल व त्यानंतर लगेचच महापौर आणि उपमहापौर पदासाठी आवजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
यातही जर उमेदवारांना समसमान मते मिळाली तर चिठ्ठ्या टाकून महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केली जाईल. प्रक्रियेअंती पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील.

