वसई:– मंगळवारी वसई विरार महापालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात महापौर पदी बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील यांची निवड झाली तर उपमहापौर पदी मार्शल लोपीस यांची निवड झाली आहे. अजीव पाटील हे असे विरार महापालिकेचे सातवे महापौर ठरले आहेत. तर मार्शल लोपीस हे महापालिकेचे पाचवे उपमहापौर ठरले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या वसई विरार महापालिका निवडणुकीत बविआने विजय मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ११५ जागापैकी बविआला ७०, काँग्रेसला १, भाजपाला ४३, शिवसेनेला (शिंदे गट) १ जागा जिंकता आली आहे. या निवडणुकीनंतर सर्वानाच महापौर निवडीचे वेध लागले होते.

बविआकडे स्पष्ट बहुमत असल्याने सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले होते. मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी बविआसह भाजपनेही महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केले होते.

महापौर पदासाठी बविआतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने आणि निशाद चोरघे, तर भाजपकडून अॅड. दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज सादर केले होते. तर उपमहापौरपदासाठी बविआकडून कन्हैया भोईर, मार्शल लोपीस तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी अर्ज दाखल केले होते.

मंगळवारी (३ फेब्रुवारी) पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

महापौर पदाच्या निवडणुकीसाठी चार उमेदवार रिंगणात होते. यापैकी बहुजन विकास आघाडीच्या प्रफुल्ल साने आणि निशाद चोरघे यांनी माघार घेतली. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील आणि भाजपच्या दर्शना कोटक त्रिपाठी यांच्यात थेट लढत झाली. यावेळी झालेल्या आवाजी मतदानात अजीव पाटील यांना ७१ मते तर दर्शना कोटक त्रिपाठी यांना ४४ मते मिळाली. त्यामुळे २७ मतांनी अजीव पाटील यांना विजय घोषित करण्यात आले असून त्यांची महापौर पदी निवड करण्यात आली.

त्यापाठोपाठ उपमहापौर पदासाठीही निवडणूक पार पडली. या पदाच्या निवडणुकीसाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. यापैकी बहुजन विकास आघाडीचे कन्हैया भोईर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बविआचे मार्शल लोपीस आणि भाजपचे नारायण मांजरेकर यांच्यात लढत झाली. या लढतीत ७१ मते मिळवत मार्शल लोपीस हे ख्रिस्ती समाजाचे दुसरे उपमहापौर ठरले.

शिट्ट्या वाजवून जल्लोष

शिट्टी हे बहुजन विकास आघाडीचे निवडणूक चिन्ह होते. निवडणुकीच्या काळात शिट्टी वाजवून उमेदवारांचा प्रचार करण्यात आला होता. तर महापौर निवडीच्या दिवशी मतदानापूर्वी सर्व नगरसेवकांना शिट्टीचे वाटप करण्यात आले होते. तर महापौर आणि उपमहापौर पदी बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील आणि मार्शल लोपीस यांची निवड होताच सर्व नगरसेवकांनी शिट्टी वाजवून जल्लोष केला