Bahujan Vikas Aghadi vs BJP: वसई विरार महापालिकेच्या निवडणूकीनंतर बुधवारी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.नुकत्याच पार पडलेल्या वसई विरार महापालिका निवडणुकीत बविआने विजय मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ११५ जागापैकी बविआला ७०, काँग्रेसला १, भाजपाला ४३, शिवसेनेला (शिंदे गट) १ जागा जिंकता आली आहे.
या निवडणुकीनंतर आता सर्वानाच महापौर निवडीचे वेध लागले आहेत. आज (३ फेब्रुवारी) महापौर व उपमहापौर यांची निवड होणार आहे. बविआकडे स्पष्ट बहुमत असल्याने सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले होते. मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी बविआसह भाजपनेही महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केले आहे.
महापौर पदासाठी बविआतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने आणि निशाद चोरघे, तर भाजपकडून अॅड. दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज सादर केले आहेत. तर उपमहापौरपदासाठी बविआकडून कन्हैया भोईर, मार्शल लोपीस तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.
महापौर निवडीची प्रक्रिया एक वाजल्यापासून सुरू होणार आहे. यासाठी प्रथम नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांकडून अर्ज मागे घेतले जातील. त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी आवजी मतदान पद्धतीचा अवलंब करून उमेदवारांची निवड करण्यात येईल.
महापौर निवडीसाठी प्रशासन सज्ज झाले असून महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापासून महापौर दालनापर्यंत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. तर महापौर दालन, उपमहापौर दालन, महासभा सभागृह, सभागृह, विरोधी पक्ष नेता दालन स्वच्छ करून फुलांनी सजवण्यात आले आहे.

