वसई:- वसई विरार महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केली जाणार आहेत. निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत सत्तेत आलेल्या बहुजन विकास आघाडीचाच महापौरव उपमहापौर बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याबाबत हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वसई विरार महापालिका निवडणुकीनंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजेच शहराचा महापौर व उपमहापौर कोण होणार ? त्यामुळे राजकीय वर्तुळात ही विविध विजयी उमेदवारांच्या व इच्छुकांच्या नावांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ३ फेब्रुवारीला पीठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष महासभा घेऊन महापौर व उपमहापौर यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी म्हणजेचे ३० जानेवारीला महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत.
बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी ७१ जागा जिंकल्या असून महापौर हा बविआचा बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण आहे. त्यामुळे बविआ कडे ही या पदासाठी इच्छुकांची गर्दी वाढत असल्याने चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत ७ महापौर आणि १० उपमहापौर पदाकरीता इच्छुक उमेदवारांचे नावं समोर आली आहेत. काहींनी महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांसाठी अर्ज दिले असल्याची माहिती माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.
असा असेल महापौर
महापौर व उपमहापौर निवडीच्या संदर्भात बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. महापौर आणि उपमहापौर ठरवताना एकच निकष डोळ्यासमोर ठेवला जाणार आहे. यात आमचा महापौर व उपमहापौर सर्व जाती, धर्म व पंथाच्या लोकांना लोकशाही मार्गाने एकत्रित पणे पुढे नेणारा आणि नगरसेवकांची, कार्यकर्त्यांची तसेच जे उमेदवार निवडणुकीत पडले आहेत अशा सर्वांची कामे करणारा आमचा महापौर असेल असे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.आम्ही सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी बसवून महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार ठरवू आणि अर्ज सादर करू असेही त्यांनी सांगितले.
विरोधकांना कायम विरोधातच बसू दे
नुकतीच पार पडलेली वसई विरार महापालिकेची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. विशेषतः बविआ आणि भाजप या दोन्ही पक्षात मोठा संघर्ष पहायला मिळाला. यात ११५ जागा पैकी बविआने ७१ जागा जिंकल्या असल्या तरी भाजपनेही महायुतीत राहून ४४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप आता बविआ समोर एक सक्षम विरोधक म्हणून समोर आले आहेत. याबाबत बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत
विरोधी पक्ष नेते महापालिकेत बसले तर बसुदेत मला फरक पडत नाही. आमचे नगरसेवक काही चुकीचं करतात का? त्यामुळे त्यांना आयुष्यभर विरोधकच राहूदे असे ठाकूर यांनी सांगितले आहे.

